पिंपरी - इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. उगमापासून संगमापर्यंतची गावे आणि औद्योगिक वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २३ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे नियोजन केले आहे. त्याची निविदाप्रक्रिया येत्या दोन महिन्यांत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’ करत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचे आजचे चित्र आहे.
इंद्रायणी नदीचे अस्तित्व म्हणजे ‘ऑक्सिजनविरहित वाहणारे सांडपाणी’ अशी झाली आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह मावळ आणि खेड तालुक्यातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांतील रसायनयुक्त आणि घरगुती मैलामिश्रित सांडपाणी गटारे, नाले, ओढ्यांद्वारे थेट नदीत मिसळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा चऱ्होलीतील एसटीपी सुरू आहे.
त्यात घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे; पण मुख्य औद्योगिक परिसर असलेल्या चिखली-कुदळवाडीतील एसटीपी अद्याप कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे घरगुतीसह औद्योगिक रसायनयुक्त सांडपाणी नाल्याद्वारे चिखली-मोई पुलाजवळ थेट नदीत मिसळत आहे.
तसेच उगमापासून संगमापर्यंत असलेल्या गावांमध्ये व तळेगाव, चाकण, निघोजे, म्हाळुंगे, मरकळ, धानोरे, खराबवाडी, कुरुळी, चिंबळी आदी भागांतील कंपन्यांचे ‘एसटीपी’ नाहीत. त्यामुळे त्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), आळंदी व तळेगाव नगर परिषद, देहू नगरपंचायत व ग्रामपंचायतींचे प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढूपणा करत आहे.
नदीचे प्रदूषण मात्र वाढत आहे. त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण शून्यावर गेले आहे. रासायनिक घटक वाढले आहेत. पाण्यावर काळसर तवंग व फेस अनेकदा बघायला मिळतो. याविरुद्ध ‘सकाळ’ने वेळोवेळी वस्तुस्थिती मांडून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. वारकऱ्यांचसह पर्यावरणप्रेमींची भूमिका मांडली आहे. काय करायला हवे, हे प्रशासन व राजकीय कारभाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता यश येत असल्याचे दिसत आहे.
‘सकाळ’च्या वृत्तांची दखल
इंद्रायणी नदी प्रदूषणाबातचे वृत्त ‘सकाळ’ने वेळोवेळी देऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले. त्या वृत्तांची दखल घेऊन इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, उमा खापरे यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असल्याचे सांगितले, तसेच खासदार श्रीरंग बारणे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनीही नदी प्रदूषणाबाबतची वृत्त मागवून घेतली आहेत. त्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कारभारीही सरसावले असल्याचे दिसत आहे.
‘पीएमआरडीए’ने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत ८२ किलोमीटर अंतरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआर (विकास आराखडा अहवाल) तयार केला आहे. तो रिव्हर कन्झर्व्हेशन डायरेक्टरेट यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यामध्ये पीएमआरडीए हद्दीत २३ ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे ५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिका व एमआयडीसीची आमचा समन्वय आहे. या संस्था त्यांच्या क्षेत्रात एसटीपीचे काम करणार आहेत.
- दीपक सिंगला, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए
शहरातील ‘एमआयडीसी’तील उद्योगांचे रासायनिक व औद्योगिक सांडपाणी वेगळ्या भूमिगत वाहिन्यांद्वारे एकत्र करायचे. ते ‘सीईटीपी’त आणून त्यावर प्रक्रिया करायची असे प्राथमिक नियोजन आहे. सुमारे तीन हजारांवर लघुउद्योग सीईटीपीला जोडण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चाकण व तळेगाव एमआयडीसीचा भागही असेल. कोणती कंपनी कोणते रसायन वापरून सांडपाणी सोडते, याची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. नंतर डीपीआर तयार केला जाईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी दोन-तीन बैठका झाल्या आहेत. उद्योगमंत्र्यांनी आढावा घेतला आहे. नदीच्या उगमापासून संगमापर्यंतचा औद्योगिक परिसर व गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारण्यात येणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया दीड-दोन महिन्यांत सुरू होईल. साधारण दीड वर्षात सर्व एसटीपी कार्यान्वित करण्याचे उद्योगमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला सांगितले आहे. मी वैयक्तिक त्यासाठी पाठपुरावा करत आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.