पिंपरी - संत तुकारामनगरमधील पदपथांवरील अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओंलाडावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाला हक्काचे कार्यालय नाही. रहिवासी भागात हॉटेल सुरू केल्यामुळे दुर्गंधीचा भयंकर त्रास आम्हा ज्येष्ठांना होतोय. परिसरातील ९६ घरांना महापालिकेकडून स्वतंत्र कर पावती आणि पाणीबिल दिले जात नाही. ९६ जणांमध्ये विभागणी करून घ्यावे लागत आहे.
अशा विविध समस्यांसाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी जातो, पण आम्हा ज्येष्ठांना ‘आज या, उद्या या’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ‘आयुक्त साहेब, तुम्ही आम्हाला कधी भेटणार?’ असा थेट सामूहिक प्रश्न संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी ‘सकाळ’च्या ‘संवाद ज्येष्ठांशी’ उपक्रमात विचारला आहे.
संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनात ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी ‘सकाळ’चा ‘संवाद ज्येष्ठांशी’ उपक्रम राबविला. या वेळी संघाचे अध्यक्ष निशिकांत गोडबोले, कार्याध्यक्ष श्यामराव कदम, संजय शुक्ल, बाळू ताम्हाणे, रऊफ शेख, श्रीराम वैद्य, बापू फटांगळे, हरिभाऊ कळमाकर, प्रभाकर मटकर, जिजाराम गोरे, मधुसूदन कुमठेकर, शशिकांत इनामदार, मोरेश्वर शेटे, विजय उपाध्याय, अनिल पुरोहित, मनीषा देव, छाया बनसोडे आदी उपस्थित होते.
संघाचे उपक्रम
संघात कॅरम स्पर्धा भरवण्यात येतात.
ज्येष्ठांची वार्षिक सहल काढण्यात येते.
ज्येष्ठांची कोजागरी पौर्णिमा
ज्येष्ठांचे वाढदिवस, वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
मासिक सभेत गाणी, कथाकथन, प्रवास वर्णन कार्यक्रम
ज्येष्ठ नागरिक म्हणतात...
बाळू ताम्हाणे म्हणाले, ‘वीज भरणा केंद्र, टपाल कार्यालयाचे सेवा केंद्र जवळपास उपलब्ध करावे.’
श्रीराम वैद्य म्हणाले, ‘दोन वर्षापासून पीएमपी बस सेवा बंद केली आहे.’
वसंत भांडेकर म्हणाले, ‘महेशनगर चौपाटीत वाहतूक कोंडीमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.’
भालचंद्र देशपांडे म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिक संघाची सदस्य संख्या पाहून संघ सुरू करण्यास परवानगी द्यावी. टपरीमुक्त वॉर्ड करावा.’
श्यामराव कदम म्हणाले, ‘डीजेवर बंदी घालावी. सरकारी आवारात कुत्री पाळण्यास मनाई करावी.’
महापालिकेकडून संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघाला जागा देण्यात आली आहे. फर्निचर व इतर साहित्य दरवर्षी देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात जागा दिली नाही. संघाची नोंदणी झालेली आहे. पण जागा वाटपाचे अधिकृत पत्र देणे बाकी असल्याने महापालिकेकडून अधूनमधून कार्यालय सील करण्यात येते.
- निशिकांत गोडबोले, अध्यक्ष, संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघ
शहरातील पहिला नोंदणीकृत आमचा संघ आहे, तरी संघाच्या कार्यालयाला अनधिकृतपणे कुलूप लावण्यात येते. १५ वर्षांपासून राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनातील हॉल वापरत आहोत. ज्येष्ठ लोकांना जिना चढून जाताना त्रास होतो. तळमजल्यावर अधिकृत हॉल द्यावा.
- संजय शुक्ल, सचिव, संत तुकारामनगर, ज्येष्ठ नागरिक संघ
अग्निशामक कार्यालयाच्या बाजूला रहिवासी भागात हॉटेलमुळे दुर्गंधीचा त्रास होतोय. महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. कधीही कारवाई केली जात नाही. आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना नाक दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
- शशिकांत इनामदार, सदस्य, संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघ
संवाद ज्येष्ठांशी
संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघ
संघ स्थापना : १-६-१९९७
४४ - एकूण सभासद
३६ - पुरुष सभासद
८ - महिला सभासद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.