पिंपरी : प्रेयसीला पळवून नेणाऱ्याचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी पळवून नेणाऱ्याच्या मित्राचे अपहरण करीत गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून मुळा नदी पात्रात टाकला. दोन वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले.
धीरज मायराम नागर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरिफ सिद्दीक शेख (वय ३२, रा. थेरगाव), सूरज ऊर्फ सोन्या अरविंद जगताप (वय ३०, रा. देहूरोड), सागर सुरेश जगताप (वय ३०, रा. थेरगाव) , चेतक नेपाळी अशी आरोपींची नावे आहेत. आरिफ शेख याच्या प्रेयसीला धीरज याच्या मित्राने पळवून नेले. पळवून नेलेल्या तरुणाचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी आरोपींनी ३१ जुलै २०१९ ला धीरजचे मावळातील कान्हेगाव येथील रेल्वे स्थानकासमोरून अपहरण केले.
वाकडमधील मुंबई बेंगलोर महामार्गावरील मुळा नदी पात्रालगत असलेल्या एका भंगाराच्या दुकानात आणून त्यांना बेदम मारहाण केली. सूरज याने धीरजचे पाय पकडले तर सागर व चेतक यांनी हात पकडले. त्यानंतर सुरजने धीरज यांचा हाताने गळा आवळून खून केला. मृताची ओळख पटू नये व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने धीरज यांच्या अंगावरील कपडे काढून मृतदेह वाकड येथे मुळा नदीपात्रात टाकला. या प्रकरणातील साक्षीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरिफ, सूरज व सागर हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरिफ व सागर सध्या इतर वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.