पिंपरी - लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विविध पक्षांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते शहरात येऊन सभा गाजवत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत बदललेली राजकीय समीकरणे व रायकीय गणितांमुळे २०१९ च्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आता एकाच व्यासपाठीवर येत आहेत. तर त्यावेळी एकाच व्यासपीठावर आलेले नेते आता एकमेकांची उणी-धुणी काढत आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. १३) आहे. मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. सोमवारी मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. बारामती मतदारसंघात शहरातील ताथवडेसह लगतच्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे आदी गावांचा समावेश होता.
मावळ मतदारसंघात पिंपरी व चिंचवडसह मावळ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघचा समावेश आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघासाठी झालेले मतदान शहरातील नागरिकांनी अनुभवले आहे. त्यासाठी झालेल्या सभांच्या तोफा थंडावल्या आहेत. मात्र, मावळ व शिरूरसाठीच्या सभा अद्याप सुरूच आहेत.
प्रचारसभा कोणत्याही उमेदवाराची असो, राजकीय आरोप-प्रत्यारोप बघायला आणि ऐकायला मिळत आहेत. मात्र, २०१९ च्या निवडणुकीच्या किंवा त्याअगोदरच्या निवडणुकांच्या तुलनेत आताची निवडणूक खूपच वेगळी ठरत आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत नवीन राजकीय समिकरणे उदयास आली आहेत.
२०१९ च्या निवडणुकीत एकमेकांसोबत असलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात असून, एकमेकांचे उणे-धुणे काढत आहेत. त्यावेळी एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आता एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांचे गुणगाण गात आहे. हा विरोधाभास निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे.
अशी होती २०१९ ची स्थिती
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती होती. त्यांच्यासमवेत रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष होते. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होती. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून युतीतील शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार उमेदवार होते.
‘वंचित’कडून राजाराम पाटील रिंगणात होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे एकमेकांच्या विरोधात होते. कोल्हे हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नेते अजित पवार यांच्यासह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सभा गाजवल्या होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सभा झाल्या होत्या.
अशी आहे आताची स्थिती
लोकसभेच्या आताच्या (२०२४) निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे व ४० आमदार भाजपसोबत आले आहेत. त्यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीही राष्ट्रवादीचा एक गट फुटून भाजपसोबत गेला आहे. त्यांनाही राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह मिळाले आहे.
त्यामुळे शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार असे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप यांची महायुती आहे. आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षांची महाविकास आघाडी आहे. ‘वंचित’ने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत आहे. २०१९ मध्ये वंचित उमेदवार असलेले राजाराम पाटील आता बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आहेत.
अशा होताहेत सभा
1) महायुतीच्या सभांना भाजपचे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री अजित पवार, मनसेचे राज ठाकरे, आरपीआयचे रामदास आठवले संबोधित करत आहेत. २०१९ मध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात प्रचार करणारे अजित पवार आता बारणे यांचा प्रचार करत आहेत. तर, बारणे यांचा प्रचार केलेले उद्धव ठाकरे आता त्यांच्याविरोधात प्रचार करत आहेत.
2) शिरूर मतदारसंघात २०१९ मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांचा समर्थनार्थ आणि शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात अजित पवार यांनी प्रचार केला होता. आता आढळराव त्यांचे उमेदवार असून, पवार हे कोल्हे यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. राजकीय सोयीसाठी आढळराव यांना शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे.
3) महाविकास आघाडीच्या सभांना शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, ‘आप’चे संजय सिंह, पृथ्वीराज चव्हाण संबोधित करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत पवार, सुळे, चव्हाण, अजित पवार विरुद्ध ठाकरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील अशी रंगत होती. आता ठाकरे महाविकास आघाडीकडे आणि अजित पवार महायुतीकडे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.