Chinchwad News : ऐतिहासिक चिंचवडचा वैभवशाली विकास
महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थळ, मोरया गोसावी यांनी स्थापन केलेली गणेशाची मूर्ती अर्थात मंगलमूर्ती वाडा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाभलेले सानिध्य, महान क्रांतिकारक चापेकर बंधूंचे वास्तव्य लाभलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा क्रांतितीर्थ अशी चिंचवडगावची ओळख. साहित्यिक व सांस्कृतिक कलेचा वारसा जपणारं गाव. पवना नदीच्या काठावरचं आणि मुंबई-पुणे लोहमार्ग आणि महामार्गालगत वसलेलं. गर्दझाडींनी पर्यायाने पर्यावरणाने समृद्ध. इतिहासाच्या पानांत आपला वेगळा ठसा उमटवलेलं आणि पूर्वी चिंच व वडाच्या झाडांनी व्यापलेलं गाव म्हणून चिंचवड. आता विकासाकडे झेपावत आहे. ऐतिहासिक खुणा जपत वैभवशाली विकास करत आहे.
पुण्यानजीक चिंचवडगांव।
मोरया गोसावीनं। क्रांतिकारकानं।।
चापेकरांनं केलं पावन।
त्याच गावाचा। शाहीर राहणार।।
भारतामध्ये भ्रमण करणार।
क्रांतीचे गीत सदा गाणार ।। जी... जी
दिवंगत शाहीर योगेश यांच्या या ओळी. चिंचवडगावाचा समृद्ध इतिहास अधोरेखित करतात. शाहिरांचं कार्यक्षेत्र असलेलं चिंचवड आणि त्यांच्या पोवाड्यांचा विषय महाराष्ट्रातील क्रांती. राजे शिवछत्रपतींनी घडवून आणलेली क्रांती. त्यांच्याच काळात महासाधू मोरया गोसावी होऊन गेले. मोरया गोसावी गावात आल्यानंतर गावाची भरभराट झाली. एक धार्मिक व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. मोरया गोसावी यांच्या पूर्वकाळात गाव खूप छोटे असावे. कारण, गावाच्या पाऊलखुणा आजही दिसत आहेत. दरम्यानच्या काळात गावाचा विस्तार झाला. वेगवेगळ्या पेठा व आळी निर्माण झाल्या. चिंचवड देवस्थानाला अनेक राजे, महाराजांनी देणग्या दिल्या. बाजारपेठेला महत्त्व आले. बाजारपेठ वाढली. आजूबाजूच्या गावांचे चिंचवड हे मुख्य व्यापारी केंद्र बनले. इंग्रजांच्या काळात रेल्वे आली. महामार्ग तयार झाला. गावाचा आणखी विस्तार झाला. १९७२ मध्ये ग्रामपंचायत विसर्जित केली. नगरपालिका आणि कालांतराने म्हणजे १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली.
गावाची वैशिष्ट्ये
- क्रांतिवीर चापेकर बंधूंचे निवासस्थान क्रांतितीर्थ
- महासाधू मोरया गोसावी यांनी स्थापन केलेली गणेशमूर्ती व मंगलमूर्तीवाडा
- महासाधू मोरया गोसावी यांच्यासह सप्तऋषींच्या समाधी
- चापेकर चौकात चापेकर बंधूंचे स्मारक
- वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, काकडे पार्क, पवनानगर, लिंक रस्ता, केशवनगर विस्तारित भाग
- मोहननगर, केएसबी चौक, विद्यानगर, काळभोरनगर, संभाजीनगर, शाहूनगर औद्योगिक भाग
झालेली कामे
- लिंक रस्त्याचा अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेंतर्गत विकास
- चिंचवडगाव ते काळेवाडी जोडणाऱ्या केशवनगर रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण
- चिंचवड स्टेशन येथे क्रांतिकारकांचे स्मारक विकसित
- जुन्या तालेरा रुग्णालयाचा विस्तार करून नवीन रुग्णालय साकारले
- हेरिटेज वॉक म्हणून ऐतिहासिक वारसा स्थळांचा मार्ग विकसित
- गांधी पेठ, राम आळीसह अन्य छोटे रस्ते रुंद व कॉंक्रिटचे
नियोजित प्रकल्प
- चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क विस्तार
- भविष्यात सीटी सेंटर व महापालिका इकोफ्रेंडली इमारत
- लिंक रस्त्यावरून संत मदर तेरेसा उड्डाणपुलावर चढणे व उतरण्यासाठी रॅम्प
- केशवनगर ते संत मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत नदी काठचा नवीन रस्ता प्रगतिपथावर
- महापालिकेकडून पवना नदी सुधार योजना आराखडा तयार
- समरसता गुरुकुलम परिसरात रस्ता व पवना नदीवर पुलाचे काम सुरू
‘‘गाव ते महानगर असा चिंचवडचा प्रवास मी बघितला आहे. साधारण पंचवीस वर्षांपासून इथे राहतो आहे. त्यावेळी गावात चाळी होत्या. दहा बाय दहाच्या खोल्या होत्या. पूर्वी तालमीही होत्या. चाळी जाऊन बंगले आले. आता काही बंगले जाऊन बिल्डींग उभ्या राहिल्या आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे गाव झाले आहे.’’
- कवी सुहास घुमरे, शिल्पकार, चिंचवड
‘‘गावात आता खूप बदल झाला आहे. विकासाच्या बाबतीत मोठे परिवर्तन झाले आहे. छोटे-छोटे रस्तेसुद्धा कॉंक्रिटचे झाले आहेत. नवीन रस्ते झाले आहेत. चापेकर चौक, आंबेडकर चौक अशी स्वतंत्र ओळख झाली आहे. पीएमपीची बस सुविधा आहे. मात्र, टर्मिनल मोठे असायला हवे. सोयी-सुविधा आहेत.’’
- अशोक वराडे, स्थानिक ग्रामस्थ, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.