पिंपरी - जालना येथे झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी (ता. ९) पिंपरी-चिंचवड शहरात ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. त्याला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर मोर्चाचे आयोजनही करण्यात आले होते.
पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झाला. या मोर्चामध्ये शहरातील विविध पक्ष व संघटनांनी सहभागी घेतला होता.
दुकाने बंद, काही शाळा सुरू
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, हॉटेल बंद ठेवली होती. शनिवारी बहुतांश शाळांना सुटी असल्याने विद्यार्थी वाहतुकीचे प्रमाण कमी दिसले. सुरु असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती. अनेक खासगी कंपन्यांना शनिवारची सुटी असल्याने नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले. बहुतांश रिक्षा चालकांनी रिक्षा वाहतूक बंद ठेवली. या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
मोर्चा व धरणे आंदोलन
‘बंद’ दरम्यान मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झाला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले. मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या.
यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या भाषणातून जालना येथील घटनेचा निषेध केला व मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाही दर्शविला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलकांकडून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्वपक्षीय उपस्थिती
मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आरक्षणाच्या मागणीला विविध संघटना, पक्ष व संस्थांनी पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष सचिन भोसले, माजी आमदार विलास लांडे, मारुती भापकर, राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन चिखले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, छावा संघटनेचे नाना जावळे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सुनील गव्हाणे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, जीवन बोराडे, धनाजी येळकर, राहुल कलाटे, माजी पक्षनेते एकनाथ पवार, धर्मराज साळवे, मनोज गरबडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता शिंदे, मीरा कदम, माणिक शिंदे, रेखा देशमुख, आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे, एमआयएमच्या रुईनाज शेख यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘आरक्षण द्या, नाहीतर राजीनामा द्या’
मोर्चाच्या समारोपादरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपस्थिती लावली. आंदोलनातील समन्वयकांची भाषणे झाल्यानंतर भाषणासाठी लांडगे यांनी ध्वनिक्षेपक हातात घेतल्यानंतर आंदोलकांच्या गर्दीतून घोषणाबाजी करण्यात आली. ‘आरक्षण द्या नाहीतर राजीनामा द्या’ अशाही घोषणा काही जणांनी दिल्या. यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘मी येथे नेता म्हणून आलेलो नाही तर एक मराठा समाजाचा भाग म्हणून आलेलो आहे.
यापूर्वी झालेल्या मराठा मोर्चातही आम्ही सहभागी झालेलो होतो. त्यावेळी सभागृहामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडणारे आम्ही सगळे मराठा आमदार होतो. आजसुद्धा मी खात्रीपूर्वक सांगतो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जे करावे लागेल ते ते करण्याच्या आमचा प्रयत्न राहील. कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या सोबत आहोत.’
हॉटेल, खानावळी बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदारांची गैरसोय
‘बंद’मुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्वीट होम्स, डेअरी, खानावळी अशा व्यावसायिकांनीदेखील आपले व्यवसाय बंद ठेवून ‘बंद’मध्ये आपला सहभाग नोंदविला. शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात आलेले बहुतांश विद्यार्थी न्याहारीसह जेवणासाठी आपल्या शैक्षणिक संस्थांनजीकच्या खानावळींवर अवलंबून असतात पण शहर ‘बंद’मुळे हॉटेल, खानावळी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
यामुळे शासकीय नोकरीनिमित्त शहरात एकटे राहणारे नोकरदार, विद्यार्थी, खासगी आस्थापनामध्ये काम करणाऱ्या नागरिकांच्या जेवणाचे हाल झाले. शहरात कोठेच खाद्य पदार्थ मिळत नसल्याने या सर्वांवर बिस्कीट खाण्याची वेळ आली. चहासाठी अनेकांना वणवण करण्याची वेळ आली.
नेहमी हॉटेलमध्ये जाणाऱ्या नागरिकांचे तसेच बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक ग्राहकांना हॉटेल बंदची माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या हॉटेलमध्ये गर्दी झाली.
रुग्णालयातील नातेवाइकांचे हाल
‘बंद’मुळे खासगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण, चहापाणी मिळणे अवघड झाले होते. शहरात संत तुकारानगर, निगडी, आकुर्डी, पिंपरी, नेहरूनगर, वाकड सारख्या अनेक ठिकाणी मोठे खासगी रुग्णालय असून, त्या ठिकाणी दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईंकाना जेवण आणि चहापाण्यासाठी वनवण करण्याची वेळ आली. जमेची बाजू एवढीच की अनेक ठिकाणी फळांच्या गाड्या सुरू होत्या. त्या ठिकाणी फळे खाण्याची वेळ या सर्वांवर आली.
क्षणचित्रे
‘बंद’ला शहराच्या मुख्य बाजारापेठांसह सर्वच भागांत प्रतिसाद
मोर्चात व आंदोलनात सर्व पक्ष, संघटना व समाजाचा पाठिंबा
तरुणाईचा लक्षणीय सहभाग
हातात भगवा झेंडा घेऊन व जय जिजाऊ व जय शिवराय घोषणांचा जयजयकार
‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणांनी परिसर दुमदुमला
दलित व मुस्लिम बांधव, भगिनींचा लक्षणीय सहभाग
मुस्लिम तरुणीने छत्रपती शिवाजी महाराज व ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले
मोर्चाच्या समारोपात व धरणे आंदोलनाच्या वेळी जोरदार पावसाची हजेरी
पावसावेळी आंदोलक जागेवरून हलले नाहीत
मोर्चा व धरणे आंदोलन शांततेत.
समारोपानंतर आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या व कचरा हलवला
पोलिसांचे नियोजन व चोख बंदोबस्त
जालना येथे झालेल्या लाठीमारामध्ये महिला, विद्यार्थी, उपोषणकर्ते यांनाही लक्ष्य करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व जालियनवाला बाग येथे झालेल्या घटनेला लाजवेल अशी ही घटना आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आरक्षण देण्याची जबाबदारी पंतप्रधान व गृहमंत्री यांची आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना झाली तर राज्यात लोकसंख्येनुसार मराठा आरक्षण मिळू शकेल.
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता
मनात आणलं तर केंद्र सरकार एका रात्रीत नोटबंदी आणू शकते. मनात आले तर पहाटे शपथविधी होतो, रात्रीत सरकार बदलले जाते. मग मराठा आरक्षणाच्या वेळी मान का खाली घातली जाते? मराठा समाजातील मुलांनी शिकायचे की फक्त शेतीच करायची ? शेतीमालाला योग्य किंमत नाही मिळाली तर मराठी मुलांनी आत्महत्या करायच्या का ?
- सुनीता शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय व जालना येथे झालेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेवरून लक्ष हटविण्यासाठी आता समाजकंटकांकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र; आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू.
- रुईनाज शेख, शहराध्यक्ष, एमआयएम, महिला आघाडी
सतीश काळेंचे उपोषण सुरूच राहणार
जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली १५ जणांनी गुरुवार (ता. ७) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असेपर्यंत सुरूच राहणार असल्याची घोषणा काळे यांनी शनिवारी (ता. ९) केली.
संसद सर्वोच्च आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुंबईत व जालना येथे बैठका करत बसण्यापेक्षा दिल्लीत जाऊन संसदेत ठराव करून, केंद्रातील मोदी सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.
- प्रकाश जाधव, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, उद्योग आघाडी.
मराठा आरक्षणाला कायदेशीर अडचण सांगितली जात असली तरी मर्यादा वाढवून देता येते. परंतु; ते देण्याची इच्छाशक्ती मोदी सरकारमध्ये असली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसायचे नाही. मराठा व ओबीसी समाज बरोबर घेऊन घरोघरी जाऊन आपण प्रबोधन करू.
- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती
मराठा समाजाला आरक्षण द्यावे; परंतु ओबीसी किंवा अन्य समाजाच्या आरक्षणातून नको. मराठा समाजाला स्वतंत्र व टिकणारे आरक्षण द्यावे. आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा केंद्रातील मोदी सरकारने उठवावी.
- ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. एवढी वर्षे आंदोलन शांततेत होत होते. कधीही गालबोट लागले नाही. ‘इंडिया’ बैठकीकडून आणि महागाई, बेरोजगारी यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे जालन्यातील लाठीहल्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. जाती-जाती, धर्मा-धर्मात वाद लावले जात आहेत.
- इम्रान शेख, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (शरद पवार गट).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.