पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांना नुकतेच पक्षाच्या नेत्यांनी तातडीने मुंबईला बोलावल्याने मंत्रिपदाबाबत शहरात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि पहाटेच्या शपथविधी दरम्यानही बनसोडे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यामुळे ते मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. या बाबत पवार काय निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री पवार यांनी एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे मागितली आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, या बाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडतून आमदार बनसोडे यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान, बनसोडे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांतर्फे अजित पवार यांना साकडे घातले. शहराचा अनेक वर्षांचा अनुशेष बनसोडे यांच्या मंत्रिपदामुळे भरून निघेल, असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले आहे. शहरातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनीही बनसोडे यांना मंत्रिपद मिळण्याबाबत अजित पवार यांना निवेदन पाठवले आहे.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. पवार यांनी घेतलेल्या प्रत्येक राजकीय भूमिकेला आतापर्यंत बनसोडे यांनी समर्थन दिले आहे. भाजपसोबत जाऊन पवार यांनी पहाटे शपथ घेतल्यानंतर अनेक आमदारांनी घरवापसी केली होती. मात्र, बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हाही अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत बनसोडे होते. या निष्ठेमुळेच त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.