आमदारांनी घेतला नगरसेवकांचा ‘वर्ग’

तळेगावातील विकासकामांबाबत एकत्रित बसून नियोजन करण्याचे आवाहन
pune
punesakal
Updated on

तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या आढावा बैठकीत सत्तारूढ भाजपच्या नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह नगरसेवकांच्या गैरहजेरीचा आमदार सुनील शेळके यांनी समाचार घेतला. ‘‘कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन जनतेची कामे करता येत नसतील, तर तोंड लपवून बसण्यापेक्षा खुर्च्या सोडून घरी बसा,’’ असा हल्लाबोल त्यांनी केला. सर्वच नगरसेवकांनी एकत्रित बसून विकासकामांचे नियोजन करावे, असे आवाहन केले.

नगरपरिषदेमध्ये आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार शेळके होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वैशाली भुजबळ, नंदकुमार खोत, डॉ. गुणेश बागडे, पोलिस निरीक्षक शहाजी पवार, मुख्याधिकारी सतीश दिघे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सत्तारूढ भाजपच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवक तर तळेगाव शहर विकास समिती व जनसेवेचे काही नगरसेवक गैरहजर होते.

सुरुवातीलाच भाजपचे सभागृह नेते अरुण भेगडे यांनी बैठक आयोजित करून पक्षाचे सर्वच गैरहजर असल्याबद्दल आमदार शेळके यांनी हजेरी घेतली. शहराच्या विकासकामासाठी नगर परिषदेला सुमारे ३५ कोटी ८८ लाखांचा निधी वर्षांपासून पडून असून, कामाला सुरुवात झाली नाही, याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शहरातील पाणीपुरवठा भुयारी गटार योजनांची कामे एकत्रित नियोजन करून संपवावीत, तरच रस्त्यांची कामे सुरू करता येतील. नगरसेवकांनी एकत्रित बसून, विकासकामांचे नियोजन करून प्रस्ताव पाठविले तर आपणाला निधी देता येईल, असे सांगितले.

या वेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, मंगल भेगडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

मुख्याधिकाऱ्यांना सूचना

शहरातील नागरिकांच्या लसीकरणासाठी दहा हजार लशी उपलब्ध करून देत असून, आरोग्य विभागाने याचे नियोजन करावे, असे आवाहन केले. तळेगाव-चाकण महामार्गाच्या रुंदीकरणात येणारे विजेचे खांब काढणे, नगर परिषदेची नूतन इमारत बांधकाम, गॅस दाहिनी आदी कामे त्वरित हाती घेण्याबाबत मुख्याधिकारी दिघे यांना सूचना केल्या. तळेगाव गाव स्टेशन व चाकण रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, भाजी मंडईतच भाजी विक्रेत्यांची बसण्याची सोय करावी, अशा सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.