Wakad News : दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल

महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन मोफत हरित उर्जेवर चालणारी वाहने उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
E-Vehicle
E-Vehiclesakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - ज्या दिव्यांग बांधवाना अधिक हालचाल करता येत नाही, जे स्वतःचा रोजगार प्राप्त करण्यास अक्षम आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी हरित उर्जेवर चालणारी पर्यावरणस्नेही फिरती वाहने (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत प्रदान केली जाणार आहेत. त्या वाहनांवर त्यांना विविध व्यवसाय करून स्वतःची उपजिविका भागविता येणार आहे.

महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन मोफत हरित उर्जेवर चालणारी वाहने उपलब्ध करुन देण्याची योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही सध्या सुरू आहे. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार ह्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार व कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ह्या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांगांना मिळण्यासाठी व अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी

https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी ह्या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांगांची भरभराट अन पर्यावरण हित

कोणाच्या दयेवर अथवा सहानुभूतीवर जगण्याऐवजी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन दिव्यांग बांधव हरित वाहनांतून फिरते दुकान थाटणार आहेत. त्यामुळे दिव्यांगाच्या सक्षमीकरणाबरोबर पर्यावरण हित देखील जपले जाणार आहे. विविध खाद्य पदार्थ, भाजी-पाला, फळे, विविध वस्तू-साहित्य, स्टेशनरी विक्री अथवा मनुष्य वाहतूक (टुरिस्ट) मालवाहतूक इत्यादी व्यवसाय दिव्यांग बांधव करुन स्वतःची भरभराट करू शकणार आहेत.

प्रतिक्रिया

जे दिव्यांग बांधव आपल्या दिव्यांगत्वामुळे हिंडू-फिरू शकत नाहीत. ते स्वतःची उपजिविका भागविण्यास सक्षम नाहीत किंवा इतर नियमित रोजगार प्राप्तिचे साधने त्यांना झेपणे अशक्य आहे अशा दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी महामंडळाची ही योजना असून जास्तीत जास्त सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवानी योजनेचा लाभ घ्यावा.

- सविता मोरे, वसुली निरीक्षक (महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ)

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या ह्या योजनेमुळे हजारो दिव्यांगांना आपला उदरनिर्वाह चांगल्या व सोप्या पद्धतीने करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. शासनाने हरित उर्जेवर चालणारे पर्यावरण स्नेही फिरते दुकान माझ्या दिव्यांग बांधवाना उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी राज्य शासनाचे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे आभार मानतो.

- विजय पगडे, अध्यक्ष, आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.