पिंपरी : "आम्ही दोघेही फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज वापरुन रुग्णांची तपासणी करत होतो. परंतु, आम्हाला कोरोनाच संसर्ग कसा झाला हे समजलेच नाही. अगोदर वायसीएममध्ये आणि त्यानंतर बालेवाडी येथील विलगीकरण केंद्रांत आमच्यावर व्यवस्थित उपचार झाले. आम्ही पूर्णपणे बरे झालो आहोत. परंतु, आता सर्वांना पुरेशी दक्षता घेऊन कोरोनासह जगायला शिकले पाहिजे. इतर आजारांप्रमाणेच हा विषाणूजन्य आजार आहे. त्यामुळे समाजाने कोरोनाबाधित रुग्णांना भेदभावपूर्ण वागणूक देऊ नये,'' असे मत मोशी प्राधिकरण येथील कोरोनाबाधित डॉक्टर दांपत्याने व्यक्त केले.
या डॉक्टर दांपत्याचे काळेवाडी येथे क्लिनिक आहे. मागील महिन्यात हे दोघे नियमितपणे रुग्णांची तपासणी करत होते. मात्र, अचानक डॉक्टरांचा त्रास वाढत गेला. त्यांनी खासगी ठिकाणी वैद्यकीय चाचणी केल्यावर त्यांना कोरोना झाल्याने निष्पन्न झाले. त्यांच्यावर पहिले 4 ते 5 दिवस पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये आणि पुढे बालेवाडी येथील विलगीकरण केंद्रांत उपचार झाले. आता, हे दोघे पूर्णपणे बरे झाले आहेत.
वायसीएम आणि बालेवाडी येथील केंद्रामधील उपचारांबद्दल अनुभव सांगताना नाव न छापण्याच्या अटीवर डॉक्टर म्हणाले, "कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर आमच्या घरातील आई-वडील, सासू आणि 2 मुले अशा सर्व सदस्यांचीही चाचणी घेण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आली. परंतु, कुठलेही लक्षण नसताना डॉक्टर पत्नीचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला. वायसीएम आणि बालेवाडी येथील केंद्रांवर आमच्यावर आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सकाळ-संध्याकाळ व्यवस्थित उपचार झाले. वेळोवेळी स्वच्छताही पाळली जात होती. डोसनुसार औषधे दिली जात असे. आमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही ठरल्यावेळी दिवसभरातून दोन ते तीनवेळा व्हिजिट होत असे. वापरा आणि फेकून द्या, अशा पॅकेटमध्ये न्याहरी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जात असे.''
सामाजिकदृष्ट्या कोरोनाबाधित रुग्ण किंवा त्यांचे कुटूंबियांना समाजाकडून मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक बदलणे गरजेचे असल्याचे सांगून हे डॉक्टर दांपत्य म्हणाले, "आमच्या सोसायटीतील लोकांचा अनुभव चांगला राहिला. रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आम्हाला सदस्य पुरवित होते. त्यांनी खूप सहकार्याची भावना ठेवली. हे आमचे भाग्यच होते. परंतु, समाजातील सर्वच लोकांकडून कोरोनाबाधितांना स्वीकारले जाते असे नव्हे. दरवर्षी नवीन विषाणू आढळून येतात. मात्र, ते सर्वच तेवढेच धोकादायक असतात असे नव्हे. कोरोना हा नवीन आजार आहे. त्यासाठी सुरक्षित सामाईक अंतर राखणे आवश्यक आहे. परंतु, रुग्णांकडे घृणास्पद नजरेने पाहणे किंवा त्यांना भेदभावपूर्ण वागणूक देणे योग्य नव्हे. हा आजार बरा होणारा आहे. फक्त, त्याचे निदान लवकरण होणे गरजेचे आहे. तसेच त्याबरोबरीने मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे,विलगीकरण करणे या प्रतिबंधात्मक गोष्टी आवश्यक ठरतात.''
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
2 ते 3 प्रकारांची दिली जात आहेत औषधे !
कोरोनावर प्रतिबंधात्मक औषधासाठी संशोधन चालू आहे. त्यामुळे सध्या भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मार्गदर्शक तत्वानुसार 2 ते 3 प्रकारची औषधे रुग्णांना दिली जात आहेत. त्यामध्ये स्वाईन फ्लूवर उपयुक्त असे ओसेल्टा मिव्हिर (टॉमी फ्लू) बरोबरच हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्यांचाही वापर केला जात आहे. आयसीएमआरच्या आदेशानुसार, उपचारांत वेळोवेळी सुधारणाही केल्या जात असल्याचे डॉक्टर दांपत्याने सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.