कौतुकाचा वर्षाव : 72 व्या वर्षी, मिळवलं लॉ विषयात गोल्ड मेडल

कौतुकाचा वर्षाव : 72 व्या वर्षी, मिळवलं लॉ विषयात गोल्ड मेडल
Updated on

पिंपरी : 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' हे कुसुमाग्रजांनी लिहिलेलं कोलंबसाचं गर्वगीत खऱ्या अर्थाने सार्थ ठरलंय. चक्क वयाच्या 72 व्या वर्षी पुणे विद्यापीठातून एलएलएमची पदवी त्यांनी मिळवलीय. उतरत्या वयात सावित्रीबाई फुले विद्यापीठात विधी परीक्षेत प्रथम येऊन 80 टक्के गुण मिळवीत त्यांनी सुवर्णपदक मिळविलं. वयाच्या सत्तरीनंतर त्या कायदेपंडीत झाल्याच मात्र, शिक्षणाला वय नसतं हे खऱ्या अर्थाने त्यांनी सिद्ध करून दाखविलं.

मूळच्या नगर जिल्ह्यातील महिला विधिज्ञ विमल सुराणा. शिक्षण व वय याचा थेट संबंध कधीच नसतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलंय. आयुष्यात प्रत्येकाने आत्मनिर्भर होऊन सकारात्मक आयुष्य जगायला हवं, हा धडा सर्वांना घालून दिला. त्यांचा जीवनप्रवास हा महिला सक्षमीकरणाचा आहे. महिलांना हक्काच्या शिक्षणासाठी ज्या काळात संघर्ष करावा लागला. त्या काळात त्यांनी उच्च शिक्षण मिळवलं. लहानपणापासूनच अंगी धाडस बांधलेल्या विमल यांचं शिक्षण नगरमधील कन्या विद्यामंदिरात झालं. 1968 मध्ये त्यांनी कला शाखेतून पदवी घेतली. सैनिकी शिक्षणामुळं त्यांच्या आयुष्यात शिस्तबद्धता वाढली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारी परिवारात जन्मलेल्या विमल यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेतला. त्यामाध्यमातून त्यांनी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या नवी दिल्लीतील परेड पथकाचं नेतृत्व केलं. शारीरिक शिक्षणाची बीपीएड पदवी मिळविली. 1974 ते 1996 या काळात त्यांनी एनसीसी ऑफिसर म्हणून नोकरी केली. एनसीसीच्या ऍडव्हान्स बेस्ट लीडरशिप कॅंम्पमध्येही त्यांना 'ऑल इंडिया बेस्ट कॅडेट' बहुमान मिळाला. संरक्षण दलाचे पहिले चिफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल करिअप्पा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1975 ते 1981 या कालावधीत त्यांनी शारीरिक शिक्षण संचालकाची नोकरी केली. त्याचदरम्यान त्यांनी एम.ए अर्थशास्त्रामधून पदव्युत्तर पदवी मिळविली. स्वेच्छानिवृत्तीनंतर चाकोरीबद्ध आयुष्य न जगता वकील होण्याचा निर्णय घेतला. याच जोडीला त्यांनी डी.एल.एल आणि एल.डब्ल्यू केले. नगर न्यायालयात वकीलीतही ठसा उमटविला. सतत नवनवीन शिक्षण घेत राहणं, हा त्यांचा छंदच बनलाय. ठरावीक वयात डिग्री मिळवून आयुष्याची दिशा निश्‍चित करण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. मात्र, यावर अवलंबून न राहता आजही त्यांनी एम.एस.डब्लयूला प्रवेश घेतला. नकारात्मक विचारांच्या माणसांमध्ये त्या रमल्या नाहीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पर्यटनाचा ही जोपासला छंद

शिक्षणाबरोबरच त्यांनी गिर्यारोहणाची आवडही जोपासली. 1976 मध्ये त्यांनी 19 हजार 800 फुटांवरील रुदगेरा शिखर पादाक्रांत करण्याची कामगिरी केली. त्याचबरोबर युरोप, चीन, दक्षिण कोरिया, श्रीलंका, बाली या देशांनाही भेटी दिल्या. आताही त्यांचा सळसळता उत्साह कायम आहे.

आयर्न लेडी इंदिरा गांधीचा आदर्श

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांनी बेस्ट एनसीसी कॅडेट पुरस्कार स्वीकारला होता. त्यांच्या विचारांचे गारुड त्यांच्यावर कायम राहिलं. इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट घेत विविध विचारमंथन केल्याचं ते सांगतात. त्यांचं व्यक्तीमत्व कायम त्यांच्या स्मरणात राहिलंय.

कोणतीही शिक्षित महिला आयुष्यात कधीच बॅकफूटवर येऊ शकत नाही. महिलांमध्ये ध्येय व चटकन्‌ निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. स्वत:ची ओळख समाजात निर्माण करणं, हा एक ध्यास असायला हवा. चूल आणि मूल या चौकटीला छेद देत आत्मनिर्भर बनायला हवं. आपला आचार, विचार सुसंगत ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला हवी.
- विमल सुराणा, महिला विधिज्ञ, नगर

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.