पिंपरी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडमधील बालेकिल्ल्याला धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ माजी नगरसेवक पुण्यात खासदार शरद पवार यांना नुकतेच भेटले आहेत. लवकरच ते त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे. माजी आमदार विलास लांडे हे देखील खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा रंगली आहे.
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसह खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त यश मिळाले. या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार हे सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदी बागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे.
भोसरी विधानसभेत आगामी काळात महायुती एकत्र लढल्यास ही जागा भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना सुटण्याची दाट शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडला जातो. मात्र, आगामी काळात जागा वाटपात नेमकी काय चित्र असेल? हे नंतरच स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशामुळे वातावरण चांगले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभेच्या १५०-१५५ जागांवर महाविकास आघाडी मताधिक्यात आहे. त्यामुळे, आगामी काळात राज्यात सत्ताबदल ही काळ्या दगडावरची रेष आहे. परंतु, बदलत्या वातावरणात पक्षात येणारे अनेक आहेत. संकटकाळात ज्यांनी आम्हाला साथ दिली; त्यांना विसरता येणार नाही. त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय वरिष्ठ नेते घेतील.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.