पिंपरी - मावळ तालुक्यातील पवना धरण शंभर टक्के भरले आहे. त्याच्या वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू आहे. त्यात शनिवारी (ता. २) पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाची भर पडली. त्यामुळे दुपारी विसर्ग वाढविण्यात आला.
शिवाय, धरणाच्या खालील बाजूस झालेला पाऊस आणि कासारसाई धरणातून सोडलेला विसर्ग, यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदी काठची गावे आणि रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा केला जातो. आठ दिवसांपूर्वी धरण शंभर टक्के भरले. त्याच्या वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू आहे. त्यात पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
धरणातून सुरू असलेला विसर्ग ८०० वरून दुपारी दोन वाजता चौदाशे क्युसेक करण्यात आला. शिवाय, कासारसाई धरणातूनही सहाशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे. परिणामी, कासारसाई व पवना नदीच्या सांगुर्डे येथील संगमापासून पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.
मुळा-पवना संगमावरील भाग
मुळा व पवना नद्यांचा संगम जुनी सांगवी येथे होतो. दोन्ही नद्यांच्या मधील भागात जुनी सांगवी आहे. तर, संगमाच्या एका बाजूला दापोडी आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातील बोपोडी आहे. संगमावर दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते.
मुळा नदी काटावरील जुनी सांगवीतील ममतानगर, संगमनगर, पवनानगर, मुळानगर, मधुबन सोसायटी, पिंपळे निलख, वाकड गावठाण, दापोडीतील सिद्धार्थनगर, पवारनगर, बोपखेलमधील गावठाण, रामनगर; पवना नदीच्या काठावरील कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, पिंपरीतील संजय गांधीनगर, सुभाषनगर, भाटनगर, बौद्धनगर, आंबेडकरनगर, चिंचवडमधील काकडे पार्क, तानाजीनगर, केशवनगर, मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पवना नदीला पिंपरी-चिंचवडमधील अनेक नाले मिळतात. यात एसकेएफ नाला, मोरवाडी नाला, कासारवाडी नाला, वल्लभनगर येथील नाला, देहूरोड हद्दीतून येणारा किवळे येथील दोन नाल्यांचा समावेश होता. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास नाल्यांमधील पाणी तुंबते. त्यांच्या काठावरील निवासी भागात, घरांमध्ये पाणी शिरते.
पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. वीज निर्मिती केंद्रातून चौदाशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे, तत्सम साहित्य, जनावरे तत्काळ सुरक्षितस्थळी हलवावेत. सर्वांनी योग्य दक्षता घ्यावी.
- समीर मोरे, धरणप्रमुख, पवना
मुळशी धरणातून अद्याप विसर्ग सुरू नाही. पवना धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे केवळ पात्रातील पातळीत वाढ झाली आहे. पाच हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग सुरू झाल्यास नागरी वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता असते. तरीही खबरदारी म्हणून नदी काठच्या सर्व भागांची पाहणी करून नागरिकांच्या स्थलांतरासाठी यंत्रणा सज्ज आहे. शनिवारी स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांनाही सावध केले आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
- ओमप्रकाश बहिवाल, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, महापालिका
धरण विसर्ग
पवना १४०० क्सुसेक
कासारसाई ६०० क्युसेक
आपतकालीन हेल्पलाइन
आपत्कालिन कक्ष - ६७३३३३३३
क्षेत्रीय कार्यालय - ९९२२५०१४७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.