पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालये वीस ऑक्टोबरला सुरू झाली. परंतु, नियमित वर्ग भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन डोस घेणे आवश्यक आहे. परंतु, बऱ्याच विद्यार्थ्यांचा पहिला व दुसरा डोस पूर्ण झाला नसल्याने विद्यार्थी महाविद्यालयांकडे कमी प्रमाणात फिरकले. त्यामुळे लस घेतलेले ऑफलाइन व लस न घेतलेले ऑनलाइन अशी काहीशी परिस्थिती डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.
शहरात नामाकिंत महाविद्यालयांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. मुलांच्या चेहऱ्यावर दीड वर्षांनी मित्र मैत्रिणींना भेटल्याचा आनंद झळकत होता. अनेकांनी पहिल्याच दिवशी कॉलेज कट्टा आणि कॅन्टीनला हजेरी लावली. परंतु, लस न घेतलेले बरेच मित्र न आल्याने अनेकांना हुरहूर लागली होती. बऱ्याच शिक्षकांना मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची धास्ती लागल्याचे दिसले.
यापूर्वी आठवी व बारावीचे वर्ग सुरू झाले. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु, सकारात्मक रुग्ण देखील सापडत आहेत. जवळपास तीन लाखांच्यावर शहरात डोस न घेणाऱ्यांची संख्या आढळून आली आहे. बऱ्याच महाविद्यालयांनी डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पाहूनच गेटवरुन प्रवेश देण्यात आला.
पन्नास टक्के क्षमतेनेच वर्ग चालविण्याचे आदेश आहेत. त्यामुळे एका बाकड्यावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले होते. प्रवेशद्वारावर सॅनिटायजर व मास्क लावल्याशिवाय मुलांना प्रवेश दिला नाही. विद्यार्थ्यांना गर्दी न करण्यासाठी सामाजिक अंतर राखण्याचे सुरक्षारक्षक सांगत होते. बरेच विद्यार्थी एकमेकांना लस घेतली की नाही याचीच विचारणा करत असल्याचे दिसले. काहींचे पालकही काळजीपोटी मुलांना घरातून निघताना गर्दी टाळण्याचे तसेच इतरत्र न फिरकण्याच्या सूचना देत होते.
‘‘आम्ही लस घेतलेल्या व न घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली. २० ते ४० टक्के विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांनी एक डोस घेतला आहे तर यातील काहींनी दोन्ही डोस घेतलेले नाहीत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलला बसता येणार नाही. पुढील सोमवारपर्यंत काही अंशी विद्यार्थी हजर राहतील.
- मनोहर पाटील, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ, काळेवाडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.