Illegal Hoarding : महापालिकेने तब्बल ७२ जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल

महापालिकेने होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले असून, बुधवारपर्यंत २४ अनधिकृत होर्डिंग आढळले आहेत.
Crime
Crimesakal
Updated on

पिंपरी - महापालिकेने होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू केले असून, बुधवारपर्यंत २४ अनधिकृत होर्डिंग आढळले आहेत. ते काढून त्यांचे जागामालक, जाहिरातदार आणि जाहिरात तयार करणारे अशा ७२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या दृष्टिने शहरात एक हजार १३६ अधिकृत होर्डिंग आहेत. त्यातील ९१८ जणांनी परवाना नूतनीकरण केलेले आहे. २१८ जणांनी नूतनीकरण केलेले नाही. अशांसाठी परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसल्यास होर्डिंगचा परवाना रद्द केला जाणार आहे.

असे गुन्हे, अशी कलमे आणि शिक्षा

शहरात आढळलेल्या २४ अनधिकृत होर्डिंगप्रकरणी ७२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ अंतर्गत कलम-३, महापालिका अधिनियम कलम २४४ व २४५ आणि भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३३६, ४२७ नुसार गुन्हे दाखल आहेत. त्यात आर्थिक दंड किंवा तीन महिन्यांचा कारावास किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे, असे महापालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल

विना परवाना जाहिरात व्यवसाय केला म्हणून ७२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जाहिरातधारक वाघेरे प्रमोटर्स, जे. के. बिल्डर्स, व्ही. कपटाऊन, सुखवानी अरतूज, यशोधन पब्लिसिटी, शुभांगी ॲडव्हर्टायझिंग, शिवशंकर ॲडव्हर्टायझिंगचे आतिश ढवळे, म्हाडा स्कीम, हॉटेल कामत, आनंद पब्लिसिटी, बालाजी फर्निचर, स्पाइन सिटी, कॅस्टल गेट, गणेश एंटरप्रायझेसचे अभिजित लखणे यांच्यासह धनंजय विठ्ठल काळभोर, प्रताप बारणे व हर्षवर्धन भोईर यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल असलेल्या जागा मालकांमध्ये महादू नढे, आत्माराम आनंदा धुमाळ, कांतिलाल मोहनलाल खिंवसरा, यश साने यांच्यासह २४ जणांचा समावेश आहे. होर्डिंग बनवून देणाऱ्या २४ जणांची नावे अद्याप कळलेली नाहीत.

तसेच, होर्डिंग लावताना त्याच्या शेवटी नागरिकांसाठी सूचना लिहिणे आवश्यक आहे. या सूचनेचा नमुना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून दिला जाणार आहे. तसेच, होर्डिंगच्या खाली टपऱ्या, दुकाने किंवा घरे असल्यास त्याबाबत जागा मालकांनी महापालिकेस कळविणे आवश्यक आहे.

अधिक आकाराचे ३४१ होर्डिंग

शहरामध्ये परवान्यापेक्षा अधिक आकाराचे ३४१ होर्डिंग आढळले आहेत. त्यांचे आकारमान सुधारण्याबाबत नोटीस देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली आहे. होर्डिंगचे आकारमान नियमानुसार न बदलल्यास ते हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच, गेल्या आठवड्यात १६ मे रोजी मोशी येथे होर्डिंग कोसळल्याप्रकणी दोन जणांविरुद्ध एसआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे महापालिका उपआयुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

सूचना न पाळल्यास, कारवाई

- जागा मालक, जाहिरातधारक यांनी कोणत्याही खासगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरवर होर्डिंग बसविताना जाहिरात फलकधारकाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी

- महापालिका आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून जाहिरात फलक धारकाने रीतसर परवानगी घेतलेली आहे की नाही याची खातरजमा होर्डिंग उभारताना जाहिरात धारकाने करावी. परवानगी नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित जाहिरातधारक, जागामालक आणि होर्डिंगधारकावर कारवाई केली जाईल.

महापालिकेने वीस अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. त्यातील नऊ महापालिकेने काढले असून अकरा होर्डिंगधारकांनी काढले आहेत. होर्डिंगधारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट लागू केला आहे. यामुळे होर्डिंगधारक सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील आणि सुरक्षित होर्डिंग उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. होर्डिंगचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृतवर नियमित कारवाई केली जाणार आहे. तशा सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.