पिंपरी : गेल्या २१ वर्षांपासून हक्काच्या जागेवर राहत असलेल्या शेख कुटुंबीयांचे स्लॅबचे घर सहा वर्षापूर्वी पिंपळे गुरव मधील उद्यानाच्या कामात उद्ध्वस्त झाले. हे कुटुंब कालांतराने उघड्यावर पडले. परंतु, कुटुंबाने हार न मानता उद्यानातच तात्पुरत्या स्वरूपाचे घर बांधून राहण्याचा निश्चय केला. परिणामी, आता उद्यानात असलेल्या घरामुळे उद्यानाचे उद्घाटनही रखडले आहे. घर मिळाल्याशिवाय उद्यानातून हलणार नसल्याचा ठाम निश्चय या कुटुंबाने घेतला आहे.
पिंपळे गुरवमधील महापालिकेचे कै. बट्टूराव अप्पा गेणूजी जगताप उद्यानाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. २००१ साली तीन गुंठ्यांमध्ये दोन खोल्यांचे टोलेजंग घर उद्यानाच्या जागेवर होते. कुटुंबाचा गाडा सुरळीत सुरू होता. परंतु, उद्यानाच्या कामात ते घर नेस्तनाबूत पालिकेने केले. उद्यान सुरू झाल्यापासून गळक्या व तुटक्या पत्र्यांच्या खोलीत वारिस शेख व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत.
त्यांना तीन मुले आणि तीन सुना आहेत. चार नातवंडे आहेत. शेख वृद्ध पती-पत्नी आहेत. असे मिळून १४ जणांचे कुटुंब त्या ठिकाणी राहतात. उद्यानातच पाण्याच्या पाइपलाइनमधून सध्या ते पाण्याचा वापर करीत आहेत. त्यांनी उघड्यावर चूल मांडली आहे. घरात झोपण्याइतपतही पुरेशी जागा नाही. उद्यानात रोज किडूक वगेरे निघून चावण्याची भीती आहे. तसेच लहान मुलांचा वावर घराबाहेर असतो. घराभोवती सर्व गवत वाढलेले आहे. स्वच्छतागृहाची सोय नाही. उघड्यावरच रोज त्यांची दिनचर्या सुरू असते. दोन लहान मुले शाळेला आहेत. त्याचबरोबर येणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळीही त्यांना सध्या उद्यानातच येऊन भेटतात.
कुटुंबातील सर्व सदस्य जेमतेम कमावतात. यातील एक मुलगा गॅरेज चालवीत असून दूसरा रिक्षा चालवितो. त्यामुळे, त्यांची परिस्थिती जेमतेम आहे. अशावेळी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत त्यांना घर चालविणे अवघड झाले होते. उदरनिर्वाहाची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे. तब्बल चार ते सहा वेळा उद्यानातून हाकलून काढण्यासाठी अतिक्रमणेचे अधिकारी व कर्मचारी आले होते. परंतु, पुन्हा ते उद्यानात घर बांधून राहिले. आत्तापर्यंत आमदार लक्ष्मण जगताप यांना ही वारंवार त्यांनी भेटून निवेदने दिली आहेत. तसेच महापालिकेत हेलपाटे मारुन शेख कुटुंबीय आता दमले आहेत. या सर्व प्रक्रियेला सहा वर्ष लोटली आहेत. आत्तापर्यंत या कुटुंबाने घरपट्टी, पाणीपट्टी व वीजबिल वेळेवर भरूनही त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
‘‘घराच्या मोबदल्या संदर्भात मंजुरीसाठी फाइल दिली आहे. काम अंतिम टप्प्यात आहे. आयुक्तांकडे फाइल गेली आहे. लवकरच त्यांना मोबदला मिळेल.’’
- अरविंद माळी, अभियंता, नगररचना विभाग
‘‘नगररचना विभागातून मोबदल्याची कार्यवाही सुरू आहे. तीन गुंठ्यांमध्ये त्यांचे बांधकाम होते. त्यांना लवकरच मोबदला मिळेल.’’
-विलास देसले, कार्यकारी अभियंता, ड प्रभाग
‘‘आम्हाला आमच्या हक्काचे घर हवे आहे. मोबदला मिळाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी घर खाली करण्यासाठी तयार आहोत. प्रशासनाच्या भरवशावर आम्ही आहोत. काम अंतिम टप्प्यात असल्याचे आम्हाला सांगितले आहे. आता घराची आशा लागली आहे.’’
- वारिस शेख, बेघर रहिवासी, पिंपळे गुरव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.