भोसरी : भोसरी पोलिस वाहतूक विभागाद्वारे भोसरीतील आळंदी रस्त्याने येणाऱ्या वाहनांना भोसरी-आळंदी रस्ता चौकातून चाकणच्या दिशेला जाण्यासाठी बंदी घालून वाहनांना पीएमटी चौकातून यू-टर्न घ्यावा लागणार आहे. या विषयाची बातमी ई-सकाळ आणि दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यावर राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी समाज माध्यमाद्वारे या विषयावर चर्चा घडवून आणली. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या नियोजनाविषयी विविध उपायही सुचविले. भोसरीतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या विषयाची सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल सकाळचे आभारही मानले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील चांदणी चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक आणि भोसरी-आळंदी रस्ता चौक हे तीन महत्त्वाचे चौक आहेत. या चौकातून भोसरी, दिघी, मोशी, चाकण, येरवडा, पुणे, खेड, पिंपरी-चिंचवड आदी भागाकडे वाहन चालक ये-जा करतात. मात्र, या चौकात आणि रस्त्यावर वाहनांची नेहमीच कोंडी पहायला मिळते. राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाच्या उभारणीमुळे काही प्रमाणात कोंडीतून सूटका झाली. मात्र, सायंकाळच्या वेळेस होणाऱ्या वाहतूक कोंडीतून भोसरीकरांची सूटका झालेली नाही. भोसरीतील भोसरी-आळंदी रस्ता चौकात आळंदी रस्त्याने येऊन मोशी-चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना इतर वाहनांमुळे अडथळा होऊन या वाहानांची चौकात गर्दी होते. यापासून बचावासाठी आळंदी रस्त्याने येऊन मोशी-चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना पीएमटी चौकातून यू-टर्न घेण्याचे नियोजन करण्यात आले. या विषयाची बातमी ई-सकाळ व दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यावर या समस्येविषयी साधक-बाधक चर्चा समाज माध्यमावर घडली.
आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
काही निवडक प्रतिक्रिया
नगरसेवक अॅड. नितीन लांडगे ः मोशी-चाकणकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्याचा वाहतूक पोलिसांचा निर्णय एकतर्फी आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना त्यांनी विचारात घेतले पाहिजे होते. आळंदीवरून मॅगझीन चौक व तेथून भोसरी पुलाखाली येणारी वाहतूक चऱ्होली येथील खडी मशीन रस्त्यामार्गे जयगणेश साम्राज्य चौकातून सरळ स्पाईन रस्ता किंवा भोसरी उड्डाण पुलावरून नाशिक फाट्याकडे वळवता येईल. तसेच, छोटी चार चाकी व दुचाकी वाहने आळंदी रोडने आल्यानंतर कै. सखुबाई गवळी उद्यानाजवळील रस्त्याने दिघीरस्त्याकडे वळवून पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी-दिघी रस्ता चौकात आणता येतील. वळणाचा रस्ता रुंद करून तेथील अतिक्रमणे काढावीत. यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांच्यातील भूमिका परस्पर समन्वयाची पाहिजे.
नगरसेविका प्रियांका बारसे ः भोसरी-आळंदी रस्त्यावरील आळंदी रस्त्यावरील वाहनांना चाकणच्या दिशेने बंदी घालण्याचे नियोजन दीड-दोन महिन्यांपासूनचे असून त्याप्रमाणे वाहतुकही सुरू आहे. मात्र रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणाजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या असणारच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यु-टर्न हा आळंदी चौकापासून लांब हवा जेणे करून तिथल्या तिथे वाहने वळताना भोसरीतील चौकांमध्ये वाहतूक कोंडी होणार
माहिती अधिकार कार्यकर्ता वसंत रेंगडे ः यु टर्न बाबतचा घेतलेला निर्णय गोंधळात भर टाकणारा आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या रस्त्यावर अधिकप्रमाणात वाहने नाहीत. म्हणून वाहतूक कोंडी होत नाही. पण, जनपद पूर्वपदावर आल्यावर कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणायची वेळ येईल. राजमाता जिजाऊ पुलाला आंळदी रस्त्याला जोडणारा समांतर पुल उभारणीचा निर्णय महापालिकेने घ्यावा. तसेच आंळदी रस्त्यावरील मंगल कार्यालये व व्यावसायिकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतूक कोंडी होते. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष घालून कडक भूमिका घ्यावी. आंळदी रस्त्यावरील एका खाजगी हाँस्पिटलने त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी अनाधिकृतपणे बॅरेक लावले आहेत. त्यामुळे रस्ता अडवला जातो, असे प्रकार थांबले पाहिजेत.
सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे ः वाहतूक पोलिसांनी घेतलेला यू-टर्नचा निर्णय योग्य आहे. महापालिकेने आळंदीरस्ता, चांदणी चौक ते भोसरी-आळंदी रस्ता चौक या सेवा रस्त्यावरील पथारीवाले पूर्णपणे हटविले पाहिजेत. कै. अंकुश लांडगे सभागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच या सभागृहाच्या पुढे बहुसंख्य पथारीवाले शिफ्ट झाले आहेत. मात्र सेवा रस्त्यावर नवीन पथारीवाले, हातगाडीवाले अतिक्रमण करतात. त्यांच्यावर अतिक्रमण विरोधी विभागाने सतत कारवाई करून रस्ता मोकळा केला पाहिजे.
माजी स्वीकृत सदस्य विजय फुगे ः भोसरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करून रस्ते मोकळे केले पाहिजेत.
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब डोळस ः भोसरीतील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. पोलिस अधिकारी व पालिका प्रशासन यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी. तसेच आळंदीरस्त्याबरोबरच दिघीरस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडविला पाहिजे. कारण महामार्गावरून सेवा रस्त्यावरून दिघीरस्त्याला वळणे किंवा दिघी रस्त्यावरून भोसरी चौक व चाकणकडे वळताना खूपच ट्रफिक जाम होते. भोसरी-दिघी चौकातच जनाई हाईटस व रुपलक्ष्मी ज्वेलर्सजवळ दुचाकि पार्किंग केल्या जातात. त्यामुळे अशोकनगरकडे जाण्यास येथील लोकांना खूपच त्रास होतो. ही समस्या दूर झाली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पोपटराव फुगे ः आमदार महेश लांडगे यांनी दिघी-भोसरी रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. भोसरीतील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही आमदार महेश लांडगे आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र सभा घेऊन तोडगा काढला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.