पिंपरी : अतिवृष्टीमुळे व धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
शहरातील विविध ठिकाणच्या जवळपास १ हजार नागरिकांना रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले असून या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक शहरात दाखल झाले असून बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड या यंत्रणांना देखील सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
रविवारी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी यांनी सखल भागांची पाहणी केली. यामध्ये मुख्यत्वे सुभाषनगर घाट, संजय गांधी नगर तसेच पिंपळेगुरव व सांगवी भागातील परिसराचा समावेश होता.
यावेळी स्थानिक नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील याकामी महापालिका प्रशासनास सहकार्य करण्याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आवाहन केले. तसेच पोलीस यंत्रणा आणि महापालिका आपत्कालीन यंत्रणा यांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.
सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात यंत्रणा सज्ज ठेवून आवश्यक ठिकाणी तात्काळ प्रतिसाद पथके पाठवून परिस्थिती हाताळावी. निवारा केंद्रात असलेल्या पुरबाधितांना भोजनासह आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच वैद्यकीय पथकाने आपले पथक कार्यरत ठेवून निवारा केंद्रातील नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
रात्री उशीरा बोपखेल येथील सुमारे १०० नागरिकांना मनपा शाळेतील निवारा केंद्रामध्ये तर रिव्हर रेसिडेन्सीजवळील महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पातील लेबर कॅम्पमध्ये पाणी घुसल्याने ८० जणांना भोसरी येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच जुनी सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेमध्ये ४० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक स्थळांच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरीत करण्यात येत असून तेथे भोजनासह आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.