पिंपरी - ‘चला रनवारीला जाऊ, विठ्ठल डोळे भरून पाहू’, असे म्हणत आणि हरिनामाचा गजर करत पिंपरी-चिंचवडमधील अकरा जणांसह एकूण १३ धावपटूंनी देहू ते पंढरपूरपर्यंतचे २४८ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत धावत पूर्ण केले. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच एका महिला धावपटूने सहभाग नोंदविला.
देहूमधील जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिरामधून रनवारीला सुरूवात झाली. ‘रनवारी’चे हे चौथे वर्ष आहे. अध्यात्माबरोबर आरोग्याचे महत्त्व पटवून देणे हा रनवारीचा उद्देश होता. भूषण तारक, जनार्दन कत्तुल, स्वामिनाथन श्रीनिवासन, सुनील पाटील, प्रीती नारायण, शिवा टाक, राजेभाऊ ढवळे, नितीन बागुल, बापुराव कत्रे, कमल तिलानी, विवेक बाली, दत्ता खोत आणि सागर हेमाडे यांनी रनवारीमध्ये सहभाग घेतला.
देहूवरून रनवारी आळंदी येथे पोहोचली. माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन सर्व धावपटू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाने दुपारी ३ च्या सुमारास दिवेघाटात पोहोचले. जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, बरड मार्गे गेले. रनवारीतील दुसरा दिवस धावपटूंसाठी थोडा कठीण ठरला. सुमारे ९० किमी अंतरामुळे शरीर थकले. काही धावपटूंच्या पायाला फोड येण्यास सुरुवात झाली.
मात्र, अभंग गात एकमेकांना साथ देत रात्री दीड वाजता सर्व धावपटू नातेपुतला मुक्कामाला विसावले. तिसऱ्या दिवशी सदाशिवनगर, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी मार्गे रात्री अडीच वाजता सुमारे २४८ किमी देहू ते पंढरपूर अंतर कापून नामदेव पायरीला पोहोचले.
प्रशांत भोसले, नंदकिशोर मुसळे, दिगंबर जानभरे, अजित गोरे, महेंद्र सोनावणे, विद्या दास, दीपक पडवळ, तानाजी देवेकर, आशुतोष गुळवेलकर, चंद्रकांत कत्तुल, आकाश पांचाळ यांची मोलाचे सहकार्य लाभले.
काहींची फलटण ते पंढरपूर धाव
अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू भूषण तारक यांच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन शहरातील आणखी काही धावपटूंनी फलटण ते पंढरपूर हे १०५ किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. पिंपरी-चिंचवड रनर्स ग्रुपचे अविनाश पाटील, डॉ. राजेंद्र चवात, विवेक चौधरी, प्रवीण पाटील, दीपक तरस यांनी त्यात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.