Actor Umesh Kamat : कलाकारासाठी रोजचं जगणं हाच ‘रियाज’

‘आम्ही कलाकार मंडळी सुदैवी आहोत. वेगवेगळ्या कला करताना वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटतो. प्रत्येक भूमिका ही वेगळे काहीतरी देत असते. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते.
Umesh Kamat
Umesh Kamatsakal
Updated on

‘आम्ही कलाकार मंडळी सुदैवी आहोत. वेगवेगळ्या कला करताना वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटतो. प्रत्येक भूमिका ही वेगळे काहीतरी देत असते. त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते. पण, अभिनय क्षेत्र हे अतिशय अनिश्‍चित आहे. मलाही अनेकदा नैराश्‍य येते; पण कला क्षेत्रात रोजचं जगणं हा एक उत्तम रियाज आहे.

लोकांना भेटणे, निरीक्षण करणे, प्रवास करणे हा एका कलाकारासाठी रियाज असतो. त्यातून व्यक्ती व कलाकार म्हणून आम्ही घडतो, असे मत निर्माता व अभिनेता उमेश कामत यांनी व्यक्त केले. मला प्रत्येक दिवस चांगला जगायला आवडतो. भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार न करता ‘आता’मध्ये जगणे जास्त आनंददायी असते, असेही त्यांनी नमूद केले.

‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापन दिन २९ नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर उमेश कामत यांनी ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाला गुरुवारी (ता. २३) भेट दिली. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका, वेब सीरीज, फिटनेस याविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.

नाटक हे टीमवर्क

एखाद्या नाटकाची संहिता पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून ऐकतो. त्यानंतर कलाकार म्हणून हे सादर करावे वाटत आहे का? याचा विचार करतो. त्यानंतर त्याचे निर्मितीमूल्य काय आहे, हे पाहिले जाते. नाटक हे टीम वर्क असते. त्यामुळे कलाकार म्हणून एखादी गोष्ट दिग्दर्शकाला सुचविली तर तो नक्कीच आमचे मत ग्राह्य धरतो. त्यामुळे नाटकामध्ये कलाकाराने काही बदल सुचविले तर ते नक्कीच मान्य केले जातात.

‘किक’ असणे आवश्‍यक

सध्या वर्षाला ३५ ते ४० नाटके येत आहेत. मात्र, त्यातील दहा-बारा नाटकेच चालतात. त्यामुळे नाटक यशस्वी करण्यासाठी झटून काम करावे लागते. आजच्या तरुण नाट्यकलाकारांचे नाटकावर प्रेम आहे. आमच्या नाटकाच्या संघातील कलाकार वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. नाटक करण्यासाठी एक किक असणे आवश्‍यक आहे. ती कलाकारांमध्ये असते.

वास्तववादी मांडणी महत्त्वाची

वेब सिरीज करायला आवडेल. कोणत्याही कलाकृतीसाठी लेखक दिग्दर्शक खूप महत्त्वाचा असतो. वास्तववादी व सर्वसामान्यांशी संबंधित कलाकृती प्रेक्षकांना पाहायला आवडतात.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आवडीचे नाट्यगृह

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह माझे प्रचंड आवडीचे आहे. येथे प्रयोग हाऊसफुल्ल होणे अवघड आहे. मात्र ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग येथे हाउसफुल्ल झाला होता. त्यामुळे प्रेक्षागृहाशी वेगळे नाते आहे. शहरात दोन आयटी पार्क असल्याने नाटकाला तरुणांची संख्याही अधिक असते.

प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे अधिक लक्ष

पुण्याला सांस्कृतिक वारसा असून, नाटकाबाबत पुण्यातील रसिक दर्दी आहेत. पुण्यात नाटकाचा प्रयोग करण्याची वेगळीच उत्सुकता असते. येथील प्रेक्षक काय प्रतिसाद देतात याकडे अधिक लक्ष असते. जे आवडले ते प्रामाणिकपणे सांगतात. आणखी काय करायला हवे हे देखील आवर्जून नमूद करतात. प्रेक्षकांकडून खूप काही शिकायला मिळते. पुण्यात नाटकाला मरण नाही.

तरुणवर्ग नाटकाकडे वळतोय

सध्या तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात नाटक पहायला येत आहे. त्यामुळे त्यांना आपलेसे वाटेल तेच विषय देण्याचा प्रयत्न असतो. प्रेक्षकांचा विश्वास कमवावा लागतो. विषय दर्जेदार असल्याने एक नाटक दोन, तीन वेळा पाहणाऱ्यांचीही संख्याही अधिक आहे. ही आमच्या कामाची पावती आहे.

एकांकिकेसाठी एम. कॉमला प्रवेश

सुरवातीपासूनच अभिनयाचे वेड होते. कॉलेजमध्ये एकांकिका करीत होतो. एकांकिकेतील अभिनयातच पूर्ण वाहून दिले. बक्षिसेही मिळवायचो, यामध्ये खूप आनंद मिळायचा. बी. कॉम झाल्यानंतर केवळ एकांकिकेत काम करायला मिळावे, यासाठी एम. कॉमलाही प्रवेश घेतला. अभिनयाची आवड आजही कायम आहे.

यशाचे श्रेय दिग्दर्शक, प्रेक्षकांना

कॉलेजमध्ये एकांकिका करीत असल्यापासूनच दिग्दर्शकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. माझ्या कलेला प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. त्यामुळेच एकापेक्षा एक दर्जेदार नाटक देत आहेत. माझ्या यशाचे श्रेय दिग्दर्शक व प्रेक्षकांना आहे. त्यांच्यामुळेच आज या उंचीवर आहे.

प्रेक्षकांना भावेल तेच करण्यावर भर

प्रेक्षकांना काय आवडेल, भावेल यावर बारीक विचार केला जातो. काही तरी करायचे म्हणून न करता पूर्ण झोकून काम करण्याची तयारी कायमच ठेवतो. अगोदर आपणच प्रेषक म्हणून व कलाकार म्हणून विषय समजावून त्यानंतरच त्यावर काम करायचे.

नाटक ही एक जबाबदारी

नाटक पुढे जाण्यासाठी तरुण पिढीने नाटकाकडे वळणे आवश्‍यक आहे. काही तरुण एखादे नाटक पुन्हा पुन्हा पाहणे पसंत करतात. प्रेक्षकांना आपलेसे वाटतील, असे विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून मांडत आहोत. कधीही नाटकाकडे न वळणारा वर्ग नाटक पाहत आहे, ही आमच्या कामाची पावती आहे. आजच्या धकाधकीच्या काळात वेळ काढून, तिकीट काढून तीन तास प्रेक्षक आपल्याला वेळ देत आहेत. त्यांचे हे तीन तास चांगले जावेत, यासाठी त्यांना आवडेल असे नाटक करणे, ही आमची जबाबदारी आहे. ‘मला प्रेक्षक म्हणून काय बघायला आवडेल’ हा विचार करून मी नाटकाचे विषय निवडतो.

तब्बल ३३ नाटकांचे वाचन

प्रेक्षकांचा विश्‍वास मिळविण्यासाठी नाटकामध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. हा विश्‍वास आमच्या आधीच्या पिढीतील कलाकारांनी आपल्या मेहनतीने कमावला आहे. आपल्या सातत्याने लोकांचा विश्‍वास संपादन करायचा असेल, तर जबाबदारपणे नाटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘जर तरची गोष्ट’ करण्याआधी ३३ नाटके मी वाचली.

रोज स्वतःसाठी ४५ मिनिटे काढा

तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात तुम्हाला न थकता काम करता येईल, असा फिटनेस राखता आला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी वेगळ्या ऊर्जेची गरज असते. त्यामुळे केवळ कलाकारानेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने व्यायाम केला पाहिजे. ब्रश करण्याइतपत व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. रोज स्वतःसाठी पंचेचाळीस मिनिटे काढा व आहाराच्या योग्य सवयी लावा.

प्रेक्षकांपर्यंत पोहचणे गरजेचे

आपले प्रमोशन पाहून नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे नाटकाप्रमाणेच बदलणाऱ्या काळानुसार मार्केटिंगची स्ट्रॅटेजी बदलायला हवी. तरुण प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी जी गोष्ट आकर्षित करते, अशा पद्धतीने प्रमोशन करणे गरजेचे आहे. चाळिशीच्या प्रेक्षकांनाही नाटक पहावेसे वाटेल, यावरही भर द्यावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.