Sant Tukaram Maharaj Palkhi : अवघी उद्योगनगरी रंगली विठ्ठलनामात

जगद्‌गुरू संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून दिलेल्या या शिकवणीनुसार, लाखोंच्या संख्येने पंढरीच्या दिशेने चाललेला वैष्णवांचा सोहळा शनिवारी (ता. २९) उद्योगनगरीत दाखल झाला.
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohalasakal
Updated on

पिंपरी - होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी । काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥

वारकरी होऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पंढरपूर बघा, त्यापुढे कोणतीही साधनसंपत्ती गौण आहे. जगद्‌गुरू संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून दिलेल्या या शिकवणीनुसार, लाखोंच्या संख्येने पंढरीच्या दिशेने चाललेला वैष्णवांचा सोहळा शनिवारी (ता. २९) उद्योगनगरीत दाखल झाला.

हातात भागवत धर्माची पताका, मुखात हरिनामाचा जप, कपाळी रेखाटलेले गंध व डोळ्यांत पांडुरंगाच्या भेटीची आस आणि आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असलेले भाविक, असे चित्र सकाळपासूनच पिंपरी-चिंचवड शहरात दिसत आहे.

सकाळपासून वारकऱ्यांना सेवा देणारे नागरिक दुपारपासूनच तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्ती-शक्ती चौकात मोठ्या संख्येने जमले होते. ध्वनिक्षेपकावर लावण्यात आलेले अभंग व हरिपाठ, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले स्वागत कक्ष, कमानी आणि ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, यामुळे वातावरण विठ्ठलमय झाले होते.

देहूवासीयांकडून निरोप मिळाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी उद्योगनगरीत पोचला. मात्र, काही दिंड्या दुपारपासूनच शहरात येण्यास सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर सकाळपासून शहरातील नागरिक वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली.

पावसाच्या सरी झेलत दिंड्यांचा प्रवेश

सकाळपासूनच शहरात उन्हा-पावसाचा खेळ सुरू होता. बरसणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर घेत दिंड्यांचा हळूहळू उद्योगनगरीत प्रवेश झाला. दिंड्यांच्या मुक्कामाची सोय महापालिका शाळांमध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी भक्ती-शक्ती चौकापासूनच विविध ठिकाणी मंडप उभारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.