Motivation News : संकटात खचून न जाता मसाला व्यवसायात झेप; महिला बचत गटाच्या लघुउद्योजिकांचे यश

कोरोना महामारी आणि लॉकडाउन हा सर्वांसाठीच कठीण काळ होता. अनेक उद्योगधंदे या काळामध्ये लयाला गेले, तर काहींनी यातही तग धरला.
savitribai phule womens self help group
savitribai phule womens self help groupsakal
Updated on

पिंपरी - कोरोना महामारी आणि लॉकडाउन हा सर्वांसाठीच कठीण काळ होता. अनेक उद्योगधंदे या काळामध्ये लयाला गेले, तर काहींनी यातही तग धरला. यातीलच एक उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचा मसाल्यांचा व्यवसाय. २०१९ मध्ये चिंचवड येथील कोयनानगरमधील महिलांनी एकत्र येत या बचत गटाची स्थापना केली. घरातील जबाबदाऱ्या असल्यामुळे घरूनच काहीतरी सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

मसाले व तयार पीठे तयार करून विकण्याचा व्यवसाय करण्याचे त्यांनी निश्‍चित केले. त्यासाठी कर्ज काढून मशिनही घेतल्या. मात्र, व्यवसायाच्या अगदी सुरुवातीलाच कोरोना महामारीचे संकट उभे राहिले. मात्र, संकटात खचून न जाता या महिलांनी पुन्हा उभारी घेतली व आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.

पन्नाशीतही उत्साह

या महिला बचत गटाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्वच महिला ४५ ते ५० या वयोगटातील आहेत. मात्र, या वयातही काहीतरी करून दाखविण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे शिक्षण दहावी-बारावी इतके झाले आहे. कधी कमी शिक्षणामुळे तर कधी घरातील जबाबदाऱ्यांमुळे इच्छा असूनही त्यांना बाहेर पडून नोकरी करता आली नाही.

आपल्या तरुणपणाच्या काळात काही करता आले नाही व आता वय झाले ही खंत न बाळगता या महिला कंबर कसून कामाला लागल्या आहेत. सध्या या महिलांकडे दोन मशिन असून, त्यावर विविध मसाले, खारीक खोबऱ्याची पूड अशी उत्पादने या महिला घेत आहेत. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी वयाची अट नसते; हे या महिलांनी दाखवून दिले आहे.

कलेतून अर्थार्जन

स्वयंपाकासाठी लागणारे विविध जिन्नस बनविणे हीदेखील एक कलाच आहे. वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात असणाऱ्या प्रत्येक गृहिणीला ती अवगत असते. त्यामुळे वर्षभराचे मसाले, पापड, कुरडयासारखे उन्हाळकाम घरात अगदी न चुकता होते. यामुळे या सर्व महिलांसाठी हे जिन्नस बनविणे अगदी सवयीचा भाग होते.

याच कलेचा वापर आपल्या व्यवसायासाठी करण्याचा या महिलांनी निर्णय घेतला. व्यावसायासाठी लागणारे कौशल्य आधीपासूनच अवगत असल्याने त्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेण्याची त्यांना गरज पडली नाही. आपल्या कौशल्याचा वापर कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी होत असल्याचे त्यांना समाधान आहे.

‘आम्ही सगळ्याच जणी दहावी ते बारावीपर्यंत शिकलेल्या आहोत. त्यामुळे वय व शिक्षणाला पूरक असा व्यवसाय करत आहोत. सध्या आमच्या परिसरात राहणाऱ्या व ओळखीने आम्ही उत्पादने विकत आहोत. पण आमच्या उत्पादनांचे योग्य मार्केटिंग करण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न असणार आहे. पुढच्या पिढीतील मुलांची आम्हाला यामध्ये मदत होत आहे.’

- सुनंदा कांबळे , अध्यक्ष, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, चिंचवड

‘घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी काहीतरी करायचे, अशी इच्छा अनेक दिवसांपासून होती. त्यातूनच मसाल्याचा व्यवसाय करण्याची कल्पना आम्हाला सुचली. एकमेकींच्या मदतीने आम्ही हा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.’

- कल्पना सोनावणे, बचत गट सदस्या

‘याआधी कधीच स्वतःचे असे काही काम सुरू केले नव्हते. चार वर्षांपूर्वी आम्ही बचत गट स्थापन करून हा व्यवसाय सुरू केला. यामुळे घरातूनच काम करू शकत आहे व पैसे कमविण्याचे समाधान आहे.’

- शोभा घुगे, बचत गट सदस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.