श्री मोरया गोसावी समाधी महोत्सव २१ पासून

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव २१ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे.
Shri Moraya Gosavi Samadhi Mahotsav
Shri Moraya Gosavi Samadhi MahotsavSakal
Updated on

पिंपरी - श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव (Shri Moraya Gosavi Samadhi Mahotsav) २१ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत चिंचवड (Chinchwad) येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक, वैचारिक-प्रबोधनपर व्याख्याने तसेच आरोग्य शिबिरांसह समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६० वे वर्ष आहे. कोरोनाचे नियम पाळून महोत्सव होणार असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी शुक्रवारी (ता.१७) पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे उद्‍‍घाटन कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते २१ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिरानानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून महोत्सव पार पडणार आहे. भाविकांनी नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टने केले आहे. माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, विश्वस्त विश्राम देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, महेश पाटसकर, अतुल भंडारे उपस्थित होते.

मोरया गोसावी चरित्रपठण

महोत्सवानिमित्त २१ ते २५ डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत श्री मोरया गोसावी चरित्रपठण होईल. भजन, कीर्तन, सुगम संगीत, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, याग, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

Shri Moraya Gosavi Samadhi Mahotsav
लघुपटात अभिनयाची संधी देण्याच्या बहाण्याने कलाकारांची फसवणुक

दीक्षित यांचे व्याख्यान

२२ डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता समाधी मंदिरामध्ये चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर सामुहिक अभिषेक, आरोग्यशिबिर होणार असून, दुपारी १२ ते ४ भजन सेवा होईल. सायंकाळी साडेचार वाजता आहार तज्ज्ञ डॉ. जग्गनाथ दीक्षित यांचे व्याख्यान तर रात्री आठ वाजता वैशाली माडे आणि त्यांच्या सहकलाकारांचे सुगमसंगीत होणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिर

२३ डिसेंबर रोजी सकाळी डॉ. सौरभ फळे यांचे दंत चिकित्सा आणि डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे आरोग्य तपासणी शिबिर होईल. सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे ‘हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देव संस्थान’ या विषयावर व्याख्यान होईल. तर, रात्री ९ वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे व सहकलाकार यांचे सुश्राव्य गायन होणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा

२४ डिसेंबर रोजी सकाळी सोहम योग साधन, चरित्र पठण, याग व सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेत रक्तदान शिबिर होईल. दुपारी १२ वाजता भजन, सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत हभप कीर्तनकार संदीप मांडके यांचे कीर्तन होईल. सायंकाळी साडेसहा वाजता श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण होणार असून रात्री आठ वाजता आर्या आंबेकर आणि त्यांच्या सहकलाकारांचे सुगमसंगीत होईल.

समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी

२५ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव, चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत अखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन होईल. रात्री १० वाजता श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा येथे धुपार्ती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.