स्मार्ट सिटी की, गुंडांची सिटी

रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता तर भररस्त्यात धावती वाहने अडवून कोयते मारण्यापर्यत गुंडांची मजल गेली.
Crime
CrimeSakal
Updated on

पिंपरी - रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड (Vehicle Damage) केल्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता तर भररस्त्यात धावती वाहने अडवून कोयते मारण्यापर्यत गुंडांची (Criminal) मजल गेली आहे. पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे आपण स्मार्ट सिटीत (Smart City) राहतो की, गुंडांच्या शहरात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Smart City Or Criminal City Pimpri Chinchwad Police)

आश्चर्य म्हणजे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना ही घटना समजली व तब्बल पंधरा तासांनंतर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला तोही प्राणघातक हल्ला, हत्यार बाळगल्याचा व इतर. मात्र, व्हिडिओमध्ये वाहन फोडल्याचे स्पष्ट दिसत असतानाही तक्रार देण्यास कुणी येत नसल्याने घटनेला तीन दिवस उलटूनही वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल झाला नाही.

Crime
घरात भूत असल्याचे सांगत महिलेला दिले अगरबत्तीचे चटके

सांगवी ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे निलखमध्ये शनिवारी रात्री नऊच्या सुमारास प्रतीक संतोष खरात, चेतन जावरे (दोघेही रा. पिंपळे निलख)यांनी एका तरुणाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. नकार मिळाल्यावर प्राणघातक हल्ला करत रस्त्यावरील वाहने अडवून कोयते मारत दहशत माजवली. वाहनांच्या काचा फोडल्या. दहा ते पंधरा मिनिटे आरोपींचा हा धुमाकूळ सुरू होता. इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांना खबर लागली नाही. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यंत्रणेला जाग आली. गुन्हा दाखल होण्यास दुसरा दिवस उजाडला. यातही प्राणघातक हल्ला, हत्यार बाळगणे, आदेशाचे उल्लंघन करणे, असे कलम लावले आहेत. वाहन तोडफोडीबाबत तक्रार देण्यासाठी कुणीही न आल्याने मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. यावरून पोलिस यंत्रणा व्हिडिओ व्हायरल होण्यासह तक्रारदार येण्याची वाट पाहणार का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

भोसरीतही कोयते नाचवत माजवली दहशत

पिंपळे निलखमधील घटना ताजी असतानाच भोसरीतही सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अशी घटना घडली. प्रकाश नामदेव कराळे (रा. पसायदान कॉलनी, हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रूपेश पाटील, किरण कदम, दशरथ देवकाते (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कट्ट्यावर बसलेले असताना आरोपी कोयते व दगड घेऊन तेथे आले. आरडाओरडा करीत ‘तुमचा मुलगा स्वराज कुठे आहे, त्याला बाहेर काढ’ असे म्हणत आरोपी रूपेश याने फिर्यादीच्या छातीला कोयता लावला. दारू पिण्यासाठी त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तर दशरथ याने फिर्यादीच्या मोटारीवर दगड मारून नुकसान करीत कोयता नाचवून आरडाओरडा केला. दरम्यान, रूपेश याने ‘मी भोसरीचा भाई आहे’ असा आरडाओरडा करीत परिसरात दहशत माजवली. यामुळे कॉलनीतील रहिवासी सैरावैरा पळू लागले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Crime
लस घेतली तरी नका राहू बेफिकीर

पोलिस यंत्रणा निद्रावस्थेत

ठाण्याच्या हद्दीत चोवीस तास गस्त सुरू असल्याचे सांगितले जाते. गस्तीवरील कर्मचाऱ्यांकडून सतत घटना, घडामोडींचा आढावा घेतला जातो. यासह तपास पथक, गोपनीय शाखा, विशेष शाखा यांचीही हद्दीतील हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. यापैकी कोणालाच या गंभीर घटनेबाबत कसे समजले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केवळ धिंड काढून चालणार नाही

घटनेच्या सोळा तासानंतर जाग आलेल्या पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली. फोटोसेशन केले. काहींची वाहवा मिळवली. मात्र, अशा गुंडांचे असे कृत्य करण्याचे धाडस होतेच कसे असा प्रश्न पोलिसांनी स्वतःला विचारायला हवा. अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या तरच कायदा-सुव्यवस्था कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर उमटलेल्या संतापजनक प्रतिक्रिया

जनतेला शस्त्र परवाने द्यायला हवे, पोलिसांचा वचक राहिला नाही, असच एक हजार इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केले, तेव्हा जी चूक केली तीच आता करीत आहोत. गंभीर घटना सोडून पोलिस मास्क, लायसन नसणाऱ्यांना पकडतात, हा बॉलिवूड चित्रपटाचा परिणाम आहे. पोलिस केवळ सामान्य माणसाला मारतात, गुंडाला नाही.

नागरिकांनीही सजग राहणे गरजेचे

अशा घटना घडल्यानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळविणे आवश्यक आहे. तसेच तक्रार देण्यास माझ्याकडे वेळ नाही, अशा भानगडीत कुठे पडता, ही घटना किरकोळ आहे, अशी सबब देत अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. यामुळे अशा प्रवृत्तींना आणखी बळ मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.