पिंपरी : गेल्या आठ दिवसांपासून शहर परिसरातील तापमान वाढले आहे. त्यात पुढील दोन दिवस आणखी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यामुळे उष्माघात होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये.
अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जावे लागल्यास भरपूर पाणी पिऊन किंवा पाण्याची बाटली सोबत घेऊनच बाहेर पडावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
उष्माघात म्हणजे काय?
तापमानात वाढ झाल्यामुळे थकवा येतो, डिहायड्रेशन होऊ शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मेंदूपर्यंत उष्णता पोहोचू शकते. त्यामुळे मेंदूचे कार्य थांबू शकते. शिवाय, अन्य अवयवांवरही हळूहळू परिणाम होऊन त्यांचे कार्य थांबून मृत्यूही येऊ शकतो.
वातावरणाची स्थिती
हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे. संवेदनशील लोकांसाठी हवा रोगट आहे. श्वास घेण्यास अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असल्यास घराबाहेर घालवण्याचा वेळ कमी करावा. अतिसूक्ष्म घन व द्रव कण हुंगले जाणारे प्रदूषणकारक असतात.
ते फुफ्फुसे व रक्तप्रवाहामघ्ये प्रवेश करून ह्रदयावरही गंभीर परिणाम करू शकतात. दमा व श्वसनाचा विकार असलेल्यांना त्रास होऊ शकतो. पुढील चार-पाच दिवस आकाश अंशतः निरभ्र राहणार आहे. मात्र, काही दिवस सायंकाळी वातावरण अंशतः ढगाळ राहू शकते. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडू शकतात.
काय करावे?
शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये
घराबाहेर जावे लागल्यास पाणी पिऊन निघावे
पाण्याची बाटली जवळ ठेवावी
भरपूर पाणी प्यावे
अंगात पांढरे कपडे घालावेत
डोक्यावर टोपी असावी
तापमानवाढीमुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. मेंदूपर्यंत ताप जाऊन त्यासह अन्य अवयवांवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मृत्यू येऊ शकतो. त्याला ‘हिट स्ट्रोक’ म्हणतात. उष्णतेचा त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. शक्यतो उन्हात घराबाहेर पडू नये.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभागप्रमुख, महापालिका
पुढील दोन दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील कमाल तापमान एक ते दोन डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे. १८ व १९ एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी व सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
- शिल्पा आपटे, हवामानशास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग
तापमानाचा अंदाज
(अंश सेल्सिअस)
वार कमाल किमान
मंगळवार ३८ २४
बुधवार ३८ २४
गुरुवार ३७ २२
शुक्रवार ३७ २१
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.