जगातील कुठल्याही प्रदेशातील माणसाला साजेसे हवामान आणि नैसर्गीक वातावरण असलेले मावळातील तळेगाव पायाभूत सुविधांबाबत परिपूर्ण असल्याने जगभरातील उद्योजक तळेगावला पहीली पसंती देतात.
तळेगाव स्टेशन - जगविख्यात सेमीकंडक्टर उत्पादक वेदांता-फॉक्सकॉन उद्योग समुहाने आपला तळेगावातील प्रस्तावित प्रकल्प गुजरातमधे होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, भूमिपुत्रांच्या तोंडाशी आलेला फॉक्सकॉनच्या जवळपास दिड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा घास हिरावला गेल्याची भावना मावळवासियांमध्ये आहे.
जगातील कुठल्याही प्रदेशातील माणसाला साजेसे हवामान आणि नैसर्गीक वातावरण असलेले मावळातील तळेगाव पायाभूत सुविधांबाबत परिपूर्ण असल्याने जगभरातील उद्योजक तळेगावला पहीली पसंती देतात. न्हावाशेवा बंदर आणि विमानतळाला अगदी जवळचे असे पुणे-मुंबईच्या बांधावरील तळेगाव हे लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग,दृतगती महामार्गाद्वारे जगभराशी जोडले गेले आहे. उदयोगविश्वाच्या नकाशावर ठसा उमटवलेल्या तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक एक आणि दोनमधील सदयस्थित बड्या उद्योगांकडून याची प्रचिती येते. नुकतेच भूसंपादन झालेल्या टप्पा क्रमांक पाचमधे जागा मिळावी यासाठी देखील बरेच उद्योजक प्रतिक्षेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर गेल्या जुलै महीन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांसह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि वेदांता फॉक्सकॉनच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत तळेगाव एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प होणार असल्याबाबत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे मावळातील युवा वर्गासह उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दिड महीन्यातच हा प्रकल्प गुजरातमधील ढोलेरा येथे होणार असल्याचे वृत्त जाहीर होताच मावळातील उत्साहावर विरजण पडले आहे. हा प्रकल्प गुजरातमधे गेल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या स्वप्नातील इलेक्ट्रॉनिक सिटीत येऊ घातलेले बरेच पुरक उद्योग आपसूकच गुजरातमधे जाणार यात शंका नाही. महाराष्ट्र सरकारने प्रकल्प जाहीर केल्यानंतर आशा पल्लवित झालेल्या ब-याच पुरक उदयोगांनी लगतच्या तळेगाव आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात आपले प्रकल्प उभारण्याची तयारी देखील सुरु केली होती.त्यांचाही चांगलाच भ्रमनिरास झाल्याचे चित्र आहे.
केवळ राजकीय अनास्था आणि एमआयडीसी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकल्प गुजरातमधे गेल्याच्या भावनेने मावळातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात याचे पडसाद उमटले असून, उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्योग महाराष्ट्राऐवजी गुजरातमधे जावेत यासाठी महाराष्ट्रातीलच काही राजकीय नेते प्रयत्नशील असल्याचे जाणवत होते. तसा आरोप याअगोदरच्या उदयोगमंत्र्यांनी देखील ऊघडपणे केला होता. खुपच खेदजनक आहे.
- महेश महाजन (उद्योजक तळेगाव दाभाडे)
एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याबाबत धक्कादायक वाटायचे कारणच नाही. हे अपेक्षितच होते महाराष्ट्रातील असे बरेच उद्योग, व्यापार गुजरातला पळवले गेलेत. आपण महाराष्ट्रातील लोक फक्त पाहत बसणार.
- श्रीकांत वायकर (उद्योजक, वडगाव मावळ)
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीच्या प्रकल्पासाठी तळेगावजवळील आंबळे येथील ११ एकर जमीन निश्चित करण्यात येऊन, जवळपास पन्नास टक्के भूसंपादन देखील करण्यात आलेले आहे. स्थानिकांचा कुठलाही विरोध नसताना अचानकपणे हा प्रकल्प गुजरातला जाणे हा मावळच्या भूमिपुत्रांवर अन्याय म्हणावा लागेल. सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकल्पाच्या पुर्नप्रस्थापनेसाठी आंदोलनात सामील व्हावे.
- सुनिल शेळके (आमदार, मावळ)
आजही हजारो उद्योजकांचे भुखंडासाठीचे अर्ज एमआयडीसी प्रशासनाकडे पडून आहेत. मात्र प्रशासन लक्ष देत नाही. महाराष्ट्राच्या उद्योग खात्याला मंत्री नाही ही बाब खेदजनक आहे. मावळात सपाट जमिन,मुबलक पाणी,वीज उपलब्ध असतानाही फॉक्सकॉनसारखे प्रकल्प राज्याबाहेर जाणे याला निष्क्रिय प्रशासन आणि राजकीय अनास्था कारणीभूत आहे. इतर राज्यांनी नाकारलेले बरेच प्रकल्प गुजरातने फटाके वाजवून स्वागत करत स्वीकारले आहेत. उद्योजकांना पायघड्या घालण्याची गुजरातची मानसिकता आता तरी महाराष्ट्राने अंगिकारावी.
- रामदास काकडे (उद्योजक,तळेगाव दाभाडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.