पिंपरी : पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये भारतातील सर्वात मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ रविवारी झाली. त्यात सुमारे दहा हजार सायकलप्रेमी सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून रिव्हर सायकोलोथाॅनचा प्रारंभ भोसरीतील गावजत्रा मैदान येथून झाला. पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
रविवारी, ता. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता भोसरीतील गावजत्रा मैदानावर रिव्हर सायक्लोथॉन सुरू झाली. आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी अध्यक्ष संतोष लोंढे, अविरत श्रमदान व सायकल मित्रचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लांढे, संतोष गाढवे आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने सायक्लोथॉन घेण्यात आली.
रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्प्यांत झाली. पहिला टप्पा लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सात किलोमीटर अंतर होते. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य - संतनगर - कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता.
दुसरा टप्पा १५ किलोमीटर अंतराचा होता. अंकुशराव लांडगे सभागृह - जय गणेश साम्राज्य क्रांती चौक - जय गणेश साम्राज्य - कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता.
तिसरा टप्पा २५ किलोमीटर अंतराचा होता. सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह - स्पाईन रोड - क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर - कै. अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता.
रिव्हर सायकोलोथाॅनमध्ये सहभागी प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल देण्यात आले.इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या सायक्लोथॉनमध्ये पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसह बाहेरील नागरिकही सहभागी झाले होते.
अविरत श्रमदानच्या सदस्या नीलम गव्हाले म्हणाल्या की, आम्ही दत्त गडावर फिरायला जात असतो तिथे आमची ओळख अविरत टीम सोबत झाली. त्यांचं पर्यावरण संवर्धनाचे काम बघून आम्ही आपोआपच जोडले गेलो. अविरत म्हणजे फक्त झाडे लावणारी संघटना नसून, तिची उत्तम जोपासना करतो. त्यामुळे ती झाडे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत.
सायकल मित्र संस्थेच्या सदस्या जयश्री जाधव म्हणाल्या की, सायकल मित्र पुणे यांच्यामुळे महिला असूनही सायकलिंगचा छंद सुरक्षित जोपासला जातोय. तसेच, पंढरपूर वारी, भीमाशंकर वारी, अष्टविनायक वारी करताना सुद्धा आम्हाला सर्वांचा आधार वाटतो. सायकल मित्र ही फक्त सायकलिंग करणारी संघटना नसून, गरजूंना सायकल वाटप करणे, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे, पर्यावरण जनजागृतीसाठी व नदीच्या स्वच्छतेसाठीच ही रिव्हर सायक्लोथॉन घेतली जाते. तसेच, समाजासाठी काही करावा हे आम्हा तरुणांना नेहमी वाटत असते आणि आविरत श्रमदानच्या रूपाने आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि युवा शक्तीचा वापर योग्य कामासाठी करत आहोत.
एमआयटी कॉलेजच्या एनएसएस टीमच्या सदस्यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये समाजपयोगी काम करत असताना अविरत श्रमदान सोबत जोडले गेलो आज आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण वाढीस लागले आहेत त्याचा उपयोग आम्हाला आमच्या करिअर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येईल.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ''भोसरीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून सायकलीच सायकली बघत बघत आलो. सायकलींचा हा महासागर येथे बघायला मिळाला. या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यकर्ते म्हणून आम्ही नियम बनवतो, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचे काम तुम्ही सर्व जनता करत आहात. रिव्हर सायकलोथाॅनच्या माध्यमातून आपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहात. त्यामुळे या सर्व पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काम करणारे तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.