सोसायटी विभाजनासाठी रहिवाशांचे निदर्शन

सोसायटी विभाजनासाठी रहिवाशांचे निदर्शन

Published on

वाकड, ता. २० ः येथील ओमेगा पॅराडाईज फेज एक मधील रहिवाशांनी स्वतंत्र विभाजनाला मान्यता द्यावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (ता.१९) सकाळी ११ वाजता पदयात्रा काढत, सहकारी गृहनिर्माण संस्था उपनिबंधक विरुद्ध निदर्शने केली.
वाकडमध्ये ओमेगा पॅराडाईज ह्या ३६३ सभासदांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची मार्च २०११ मध्ये नोंदणी झाली. ६० फूट डीपी रस्ता मधून गेल्याने रस्त्याच्या एका बाजूला १७५ (एबीसीडीआयजेके) आणि दुसऱ्या बाजूला १८८ (इएफजीएच) सदनिका अशा दोन भागात सोसायटी विभागली आहे. गेल्या काही वर्षांत दोनही फेज मधील सदस्यांमध्ये देखभाल, वाटणी खर्च आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांमुळे वाद होत आहेत. दुसऱ्या बाजूच्या सदस्यांना ६० फूट रस्ता ओलांडून एबीसीडिजेके बाजूच्या सदनिकांचे व्यवस्थापन करायचे आहे आणि हे त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यातील हे वाद टाळण्यासाठी एबीसीडीआयजेके विंगच्या काही सदस्यांनी एमसीएस कायद्याच्या कलम १८ नुसार १७५ सदस्यांचा टप्पा १ आणि इएफजीएच १८८ सदस्यांचा दुसरा टप्पा अशा दोन सोसायट्यांमध्ये स्वतंत्र विभाजन करण्यासाठी उपनिबंधकांकडे अर्ज केला. पण केवळ इएफजीएच विंगमधील सदस्यांचाच समावेश असलेली व्यवस्थापन समिती विभाजन प्रक्रियेची माहिती असूनही ते निर्णय एकतर्फी घेत असल्याने वादाचे कारण बनले आहे. चुकीचा समज पसरवून विभाजन प्रक्रियेस विलंब करण्यासाठी ते दबाव आणत असल्याचे काही सभासदांनी सांगितले. याबाबत सहकारी संस्थेचे उपनिबंधक शाहुराज हिरे यांना संपर्क केला असता प्रतिसाद आला नाही.

केवळ इएफजीएच बाजूचे सदस्य असलेली व्यवस्थापन समिती क्लब हाऊस, जिम यासारख्या सुविधांना कुलूप लावणे, विश्वासू कर्मचाऱ्यांना पगार न देता कामावरून काढणे, एबीसीडीआयजेके बाजूचा पाणीपुरवठा बंद करणे, परस्पर बोअर खोदणे, सर्वसाधारण सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी न करणे, एबीसीडीआयजेके सदस्यांचे पैसे वापरून त्यांच्या एफजीएच विंगचा मेंटेनन्स खर्च भागविण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही काही सदस्यांनी केला


‘‘इएफजीएच व्यवस्थापन समिती स्थानिक लोक प्रतिनिधींचा स्वार्थासाठी वापर करत आहे. त्यामुळे ज्या गंभीर परिस्थितीचा आणि त्रासाचा सामना आम्ही करत आहोत ते अधोरेखित करण्यासाठी, आमची बाजू मांडण्यासाठी निदर्शने आणि पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यांचे १८८
आणि आमचे १७५ सदस्य असल्याने आम्ही निवडणुकीतही भाग घेतला नाही. दोन विभागांत कायम मतभेद असतात. कुठलाही निर्णय घेतल्यानंतर केसेस आणि खटले चालू होतात. हे कधीच थांबणार नाही.
- सुमितकुमार भाटिया, राहिवाशी, एबीसीडीआयजेके

‘‘ सोसायटीचे फेरलेखापरीक्षण चालू आहे. कायदेशीर प्रक्रियेद्वारे निवडणुकीत आमचे सभासद बिनविरोध निवडून आलेत. त्यांनाही ते धमक्या नोटीस देत आहेत. काही सदस्यांनी बेकायदेशीर वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली आहे. ९ महिन्यापासून मेंटेनन्स खर्च जमा न करता सोसायटी मेंटन्सन ऑपरेशन चार्जच्या नावे ते वेल्फेअरमध्ये पैसे जमा करत आहेत. मात्र पूर्ण सोसायटीची देखभाल कायदेशीरपणे स्थापित झालेली सहकारी गृहनिर्माण संस्था करीत आहे. कोणालाही कामावरून न काढता ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. काही सदस्यांनी विभाजनाची मागणी उपनिबंधकांकडे केल्याने त्यास आम्ही हरकत घेतली असून निर्णय बाकी आहे. मंत्रालयातदेखील त्याविरोधात अपील केले आहे.’’
- अरविंद सचदेवा, चेअरमन, ओमेगा पॅराडाईज सहकारी गृहनिर्माण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.