भूमिपूजने, उद्घाटने आणि भांडणे विविध विकासकामांच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-भाजप समोरासमोर
पिंपरी, ता. २५ ः कोरोना व ओमिक्रॉनचा वाढतो संसर्ग, राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यास होणारा विलंब, इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाचा न्यायप्रविष्ट विषय, यामुळे महापालिका निवडणूक नियोजित वेळेत होईल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, निवडणूक प्रचारात महत्त्वाचा ठरणारा गेल्या पाच वर्षांतील ‘कामांचा मुद्दा’ प्रभावी करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षही करत आहेत. त्यामुळे विविध कामांची भूमिपूजने, उद्घाटने आणि श्रेयवादाची भांडणे बघायला मिळत आहे.
महापालिकेत सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. २००२ ते २०१७ पर्यंत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता त्यांनी उलथवून टाकली. त्याची सल आजही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर, महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यासाठी विविध कामे केल्याचा दावा केला जात आहे. तो ‘फोल’ ठरवण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असते. त्यामुळे एकाच कामाचे दोन-दोनदा भूमिपूजन व उद्घाटन केले जात आहे. त्याच्या श्रेयावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप आणि पत्रकबाजीतून भांडणेही होत आहेत.
असे दावे, अशी भांडणे
- आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन केल्याचा भाजपचा दावा आहे, तर डिसेंबर २०२१ अखेरीस पाणी आणण्याचा भाजपचा दावा फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
- औंध-रावेत बीआरटी मार्ग रस्त्यावर शंभर कोटींची उधळपट्टी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी व शिवसेनेने केला, तर ‘विकासकामे आडवा व जिरवा’ करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल, असे भाजपने म्हटले आहे.
- पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत सदनिकांना मिळकतकर माफी, कोरोनात गरिबांना तीन हजारांची मदत, अनधिकृत बांधकामांना शास्ती माफ असे ठराव भाजपने केले. हे ठराव जनतेच्या भावनांशी खेळणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
अवघ्या ७५ तासांत उद्घाटन?
स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे सौदागर येथील सुदर्शन चौकातील समतल विलगकावरील मोकळ्या जागेत ‘आठ ते ८० पार्क’ अर्थात आठ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत वयोगटातील व्यक्तींसाठी उद्यान उभारण्यासाठी रविवारी (ता. २३) भूमिपूजन झाले. केवळ ७५ तासांत उद्यान विकसित करून त्याचे उद्घाटन बुधवारी (ता. २६) करण्याचा भाजपचा संकल्प आहे. शहरातील अन्य कामे वर्ष-दोन वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते. मग, ‘आठ ते ८० पार्क’चे त्वरित उद्घाटन कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अन्य कामेही अशीच भराभर केल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी चर्चा आहे.
हेही मुद्दे श्रेयवादाचे
- जगताप डेअरी, बिजलीनगर व डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मेट्रोतून प्रवास
- स्मार्ट सिटीतील कामे आणि गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप
- गुंठेवारीतील बांधकामांचे नियमितीकरण आणि अटी-शर्ती
- महापालिका रस्ते सफाई निविदा आणि बोगस बॅंक गॅरंटी प्रकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.