पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातील सोळा हजार वाहन परवाने प्रिंटींगच्या प्रतीक्षेत
वाहन परवान्यासाठी अर्ज करण्यापासून ते ताब्यात मिळेपर्यंत सर्व बाबी ऑनलाइन झाल्या असल्या तरी, नागरिकांच्या हातात परवाना मिळण्याच्या कामकाजात अद्याप सुसूत्रता नाही.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) (RTO) वाहन परवाने (Vehicle License) प्रिंटिंग (Printing) करण्यासाठी लागणाऱ्या प्रिंटिंग मशीनमधील रिबीन (Ribbon) संपली आहे. तसेच, प्रिटींगची चीपही (Printing Cheap) उपलब्ध नसल्याने परवान्यांचे प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण: कोलमडली असून, सुमारे १६ हजार वाहन परवाने प्रिंटींगच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहन परवान्यासाठी अर्ज करण्यापासून ते ताब्यात मिळेपर्यंत सर्व बाबी ऑनलाइन झाल्या असल्या तरी, नागरिकांच्या हातात परवाना मिळण्याच्या कामकाजात अद्याप सुसूत्रता नाही. अनेक तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अनेकांचे परवाने गहाळ झाले आहेत. त्यामुळे आरटीओच्या मोशी कार्यालयातील पायऱ्या झिजवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांना हातातील कामधंदा सोडून आर्थिक भुर्दंड सहन करत किरकोळ कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
एखाद्या व्यक्तीने आरटीओमध्ये वाहन चालविण्याचा परवाना काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने परवाना पाठवला जातो. मात्र, पोस्ट ऑफिस व आरटीओ यांच्या कारभारामुळे हे परवाने कित्येकदा तिसऱ्याच व्यक्तीला व भलत्याच पत्यावर गेलेले आहेत. त्यामुळे, पुन्हा डुप्लिकेट परवाने व आरसी बुक काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे, या वेळखाऊ प्रक्रियेचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
‘पोस्टाचा कोड न मिळाल्याने नागरिकांना त्यांचे परवाने कुठपर्यंत आले आहेत. त्याला आणखी किती दिवस लागतील याची माहिती मिळत नाही. अनेकांना पोस्टाने वेळेत परवाना मिळतो. परंतु, अनेकांना तो मिळतच नाही. ज्यांना परवाना मिळत नाही, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. माझा वाहन परवाना दुसऱ्याच जिल्ह्यात गेला होता. पोस्टाने हा परवाना मिळाला नाही. पुन्हा दुसरी प्रत काढावी लागली. नागरिकांना परवाना मिळण्याची सुविधा आरटीओ कार्यालयातून द्यायला हवी. अथवा पोस्टाने पाठविताना त्यामधील त्रुटी दूर करायला हव्यात.’
- प्रशांत नारनवरे, नागरिक, पिंपरीगाव
‘सध्या कार्डचा तुटवडा आहे. परिवहन आयुक्तालय स्तरावर माहिती दिली आहे. त्यानुसार काम सुरु आहे. चिपचा पुरवठा झालेला नाही. महाराष्ट्र स्तरावरून या एजन्सींची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे, ती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’
- मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी कार्यालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.