टपाल कार्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी टाळे

टपाल कार्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी टाळे

Published on

पिंपरी, ता. २९ ः टपाल विभागाच्या पोस्टमनसह लिपिकवर्ग दोन दिवसांपासून संपावर गेल्याने शहराची टपालसेवा सलग दोन दिवस ठप्प राहिली. या संपाचा टपाल खात्याला मोठा फटका बसला असून, व्यवहार ठप्प राहिल्याने कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. मंगळवारी (ता.२९) टपाल कार्यालयांना टाळे लावलेले दिसून आले.
या संपामध्ये ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, सर्कल सेक्रेटरी नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाक सेवक, नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, नॅशनल युनियन पोस्टमन संघटना या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक दोन दिवसीय संपात सहभागी झाले आहेत. महापालिका हद्दीतील ६० कार्यालयांमधील सर्व टपालसेवा व दैनंदिन टपाल बँकिंगचे आर्थिक व्यवहार दुसऱ्या दिवशीही पूर्णता: कोलमडले होते. दैनंदिन व्यवहारातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होऊ शकली नाही त्यामुळे या दोन दिवसांत कोट्यवधीचे टपालाचे उत्पन्न बुडाले आहे. तसेच विविध शहरांमधून शहरासाठी आलेल्या टपालाचा बटवडा होऊ शकला नाही. परिणामी मुख्य डाकघरापर्यंत टपालचा पुरवठाच होऊ शकला नाही. परिणामी शहरासह टपाल ‘आरएमएस’मध्ये पडून राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कार्यालयातील सर्वच कर्मचारी वर्ग संपात उतरल्यामुळे मुख्य प्रवेशद्वार संपाच्या दुसऱ्यादिवशी बंदच राहिले. संपामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक कामे खोळंबली. एका दिवसात ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल विविध बँकिंग व्यवहारांमधून होते; मात्र दोन दिवसांपासून सर्वच व्यवहार ठप्प राहिल्याने टपाल कार्यालयाचा कोटीचा महसूल बुडाला आहे.

बुधवारपासून होणार पूर्ववत
दोन दिवसांचा लाक्षणिक संप मंगळवारी सायंकाळी संपणार असल्यामुळे टपालाचे दैनंदिन व्यवहार व सर्व प्रकारचे कामकाज बुधवारपासून पुर्ववत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपासून रखडलेली टपालाची विविध कामे मार्गी लागणार आहेत. तसेच टपालाचा बटवडाही पोस्टमनकडून केला जाणार आहे; मात्र दोन दिवसांपासून बटवडा होऊ न शकल्यामुळे अतिरिक्त ताण पोस्टमनवर येणार आहे. यासाठी उप डाकघर ते ४० शाखा कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या पोस्टमनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.