गणेशोत्सव साहित्य दुकानांकडून भोसरी परिसरात कचऱ्याचे ढीग
भोसरी, ता. २० : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानातील टाकाऊ वस्तू तशाच रस्त्यावर फेकल्याने भोसरीतील पीएमटी चौक आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले होते. हा कचरा उचलताना महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.
मंगळवारी (ता. १९) भोसरी परिसरात घरोघरी आणि विविध मंडळाद्वारे जल्लोषात गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती उत्सवाच्या स्वागतासाठी भोसरीतील पीएमटी चौक आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली गणपती मूर्तींसह हार-फुले, सजावटीचे विविध साहित्य, पूजेचे विविध साहित्य, फळे आदी दुकानदारांनी स्टॉल उभारले होते. मात्र, सायंकाळी या विक्रेत्यांनी स्टॉलमधील टाकाऊ वस्तू तशाच रस्त्यावर फेकून दिल्याने रस्त्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २०) हा कचरा एकत्र केला जागोजागी या कचऱ्याचा ढीग साचला होता. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ट्रकचे नियोजन केले होते.
यावेळी सफाई मुकादम धनंजय गंगावणे, रोहीत झेंडे, स्वप्नील डोळस आदींनी प्रत्यक्ष जागेवर थांबून परिसराची स्वच्छता करून घेतली. महापालिकेद्वारे घंटागाडी सकाळी आणि संध्याकाळी परिसरात फिरत असते. त्यामुळे विक्रेत्यांनी त्यांच्या टाकाऊ वस्तू वेळीच घंटागाडीत टाकल्या असत्या तर मोठ्या प्रमाणात कचरा साचला नसता असेही त्यांनी सांगितले. विविध सणानिमित्त परिसरात विविध वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने उभारणाऱ्यांनी कचरा रस्त्यावर फेकून न देता वेळोवेळी घंटागाडीतच टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.