पुरामधून बापलेकांची चऱ्होलीत सुखरूप सुटका

पुरामधून बापलेकांची चऱ्होलीत सुखरूप सुटका

Published on

भोसरी, ता. २६ ः हरिद्वारवरून आळंदीत कर्करोगावर उपचार करण्यासाठी आलेल्या बापलेकाची मोटार चऱ्होलीतील भोसले वस्ती येथील ओढ्याच्या प्रवाहात सापडून वाहत गेल्याचा प्रकार घडला. चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत त्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.
मूळचे हरिद्वार येथील रहिवासी असलेल्या राजेश कोहली यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा तुषार कोहली यांनी आळंदीतील इंद्रायणी रुग्णालयाची गुरुवारी (ता. २५) भेटण्याची वेळ घेतली होती. तेव्हा ते हरिद्वारवरून मोटारीने आळंदीच्या दिशेने निघाले होते. चऱ्होलीतील भोसले वस्ती डॉ.डी. वाय. पाटील रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून त्यांची मोटार ओढ्याच्या प्रवाहाला लागल्याने वाहून जात होती. प्रसंगावधान दाखवत सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले हे ओढ्याचा प्रवाह चिरत मोटारीजवळ पोचले. तोपर्यंत ओढ्याजवळ बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, पाण्याचा प्रवाह पाहून कोणीही कोहली आणि भोसले यांच्या मदतीला धावले नाहीत.

ओढ्याला सुमारे वीस फुटांचा खड्डा
इंद्रायणी नदीला मिळणाऱ्या या ओढ्याला पुढे दहा ते वीस फूट खोल खड्डा होता. जर कोहली यांची मोटार पुढे वाहत गेली असती; तर त्यांना वाचविणे अवघड झाले असते. त्याचप्रमाणे मोटार आणखी खोल पाण्यात गेली असती; तर ती लॉक होऊन त्यांना वाचविण्यात अडचण आली असती. या धोक्याची कल्पना आल्याने भोसले यांनी जीवाची पर्वा न करता ओढ्याच्या प्रवाहात मोटारीच्या दिशेने गेले.

पुलाला अडकली मोटार
भोसले यांनी घराकडे ये-जा करण्यासाठी बांधलेल्या आणि पाण्याखाली गेलेल्या पुलाला कोहली यांची मोटार अडकून थांबली. राजेश यांना बाहेर काढत असताना ते पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. मात्र, प्रसंगावधान राखत भोसले यांनी त्यांचा हात घट्ट धरून प्रवाहाच्या बाहेर काढले. भोसले यांनी कोहली यांचा घरी पाहुणचारही केला. त्याने राजेश कोहली आणि तुषार कोहली भारावून गेले. या घटनेनंतर हा रस्ता प्रवासासाठी बंद करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com