Zendu Flower
Zendu Flowersakal

Pimpri Chinchwad: 'रस्त्यावर झेंडू फेकताना शेतकऱ्याचे अश्रू अनावर' मागणीपेक्षा आवक वाढल्याने फुले मातीमोल

मागणीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आवक झाल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली.
Published on

चिखली - मागणीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आवक झाल्याने झेंडूच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे दूरवरून झेंडूची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. अतिशय कष्टाने पिकवलेली फुले रस्त्यावरच टाकून देताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. चढ्या दराने विक्रीसाठी झेंडू घेणाऱ्या व्यापाऱ्यांनाही मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला.

दसऱ्याला पूजेसाठी झेंडूच्या फुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर राजगुरुनगर, मंचर, जामखेड, नगर, संगमनेर, पारनेर परिसरातील शेतकरी दोन पैसे जास्त मिळतील, या आशेने आपल्या शेतातील फुले पुणे- पिंपरी चिंचवड परिसरात आणून किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात तसेच स्वतः ही चौका- चौकात थांबून विक्री करतात.

मंगळवारी दसरा असल्याने दोन दिवस अगोदरच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फुले बाजारात विक्रीसाठी आणली होती. अतिशय कमी दरात म्हणजे वीस किलो फुलांचे पोते ८० ते १०० रुपये या दराने विकले गेले. सोमवारी आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे दर मिळाला. मात्र, मंगळवारी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने फुलांना दर मिळणे आणि विक्री होणे अशक्य असल्याचे लक्षात येताच किरकोळ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडील फुले खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच फुलांची विक्री करणे भाग पडले.

दोन ते पाच रुपये किलो या दराने विक्री करूनही फुलांची विक्री झाली नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांना टेम्पोतील फुले रस्त्याच्या कडेला सोडून घरचा रस्ता धरावा लागला. दर्जेदार फुलांची उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा टेम्पो भाडे निघत नसल्याने अनेक तरुण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

याबाबत खर्डा (ता. जामखेड) येथील शेतकरी सुभाष देवकते म्हणाले, ‘‘भुसार मालाची शेती परवडत नसल्याने फुलांची शेती करण्याचे ठरवले. जुलैमध्ये झेंडूची रोपे घेऊन लागवड केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने टँकरने पाणी घातले. अडीच एकर झेंडूच्या शेतीला दीड लाख रुपये खर्च आला. फुले चांगली आल्याने किमान पाच लाख रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती. सहा टेम्पो फुले घेऊन पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आलो होतो. मात्र, यावर्षी फुलाला दर न मिळाल्याने शेतीचा खर्च सोडा टेम्पोचे भाडेही घरातूनच द्यावे लागणार आहे.

मुलांप्रमाणे जपलेली फुले रस्त्यावर सोडून जाताना अकलूज येथील विजय माने या शेतकऱ्याला आपला हुंदका आवरणे अवघड झाले. ते म्हणाले, ‘‘शेतीत नफा- तोटा होत असतो. परंतु अतिशय कष्टाने सांभाळ करून फुलवलेल्या फुलांना रस्त्यावर फेकताना मोठ्या यातना होत आहेत. शेतात राबणारी बायको आणि मुलांना काय सांगावे, हा प्रश्न पडला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.