डेंगीमुक्त अभियान केवळ सोशल मीडियावरच!

डेंगीमुक्त अभियान केवळ सोशल मीडियावरच!

Published on

पिंपरी, ता. २५ ः पिंपरी-चिंचवड डेंगीमुक्त व्हावे, यासाठी महापालिकेने डेंगीमुक्त मोहीम हाती घेतली आहे. मात्र, शहरात डेंगीसदृश रुग्णांची संख्या पाहता या अभियान केवळ दिखावा ठरत आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये औषध फवारणी, कंटेनर सर्वेक्षण झालेले नाही. अनेक भागांतील नागरिकांना डेंगीच्या फवारणीसाठी कुठे संपर्क करायचा याबाबतही माहिती नाही. त्यामुळे डेंगीमुक्त पिंपरी-चिंचवड मोहीम केवळ सोशल मीडियावरच असल्याचे चित्र आहे.

जिथे रुग्ण तिथेच फवारणी नाही
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील डेंगीच्या रुग्णांची संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एक जूनपासून आतापर्यंत २९ डेंगींच्या रुग्णांची नोंद महापालिकेकडे झाली आहे. डेंगीसदृश रुग्णांची संख्याही साडेतीन हजारांच्या पुढे जाऊन पोचली आहे. यामुळे डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध व्हावा, यासाठी महापालिकेने डेंगीमुक्त पिंपरी-चिंचवड हे अभियान सुरू केले. यामार्फत शहरातील डासोत्पती ठिकाणे शोधून ती नष्ट करणे, औषध फवारणी करणे, डेंगीबाबत जनजागृती करण्यासाठी व्याख्याने, पथनाट्ये सादर करणे, शाळा महाविद्यालयांमध्ये जागृती करणे या उपक्रमांचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिका प्रशासकीय इमारत, महापालिका शाळा, खासगी व सरकारी रुग्णालये व दवाखाने या ठिकाणी ही मोहीम राबविण्यातही आली. मात्र, अनेक सोसायट्या, रहिवासी इमारती ज्या ठिकाणी डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणी अद्याप आरोग्य विभाग पोचू शकलेला नाही. त्यामुळे हे अभियान एक फार्सच ठरत आहे.

स्थानिक नेते व माजी नगरसेवकांकडे मागणी
सतत पडणाऱ्या पावसामुळे आरोग्याच्या समस्या उद्‍भवत आहेत. सर्दी, खोकला, ताप, अतिसाराच्या रुग्णांत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी व खासगी दवाख्यान्यातील रुग्णसंख्या वाढली आहे. दुसरीकडे पावसामुळे डासांची उत्पत्तीही वाढत आहे. परंतु, डासोत्पती रोखण्यासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या मोहिमा बहुतांश भागात पोचलेलल्याच नाहीत. फवारणीसाठी कुठे तक्रार करावी याबाबत नागरिकही अनभिज्ञ आहेत. काही भागात स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींव्दारे औषध फवारणी करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकही महापालिका प्रशासनाकडे न जाता स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींकडेच औषध फवारणीसाठी मागणी करीत आहेत. त्यामुळे डेंगीमुक्त अभियानासाठी लाखो रुपयांचा महापालिकेचा निधी कुठे खर्च केला जातोय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे.

‘‘महापालिकेकडून दरवर्षीच अशा प्रकारची मोहीम राबवली जात असते. त्यामुळे त्यासाठी दरवर्षी निधी ठरवून दिला जातो. महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी स्वतः यावर काम करतात. त्यामुळे वेगळा मनुष्यबळावर खर्च होत नाहीत. ज्या सोसायटी व विभागांमध्ये अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही, त्यासाठी आम्ही काही नंबर दिलेले आहेत त्यावर नागरिकांनी संपर्क करावा.
- गणेश देशमुख , आरोग्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग

‘‘आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला डासांचे प्रमाण वाढतच आहे. सध्या चालू असलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. ज्यामुळे डासांची उत्पत्ती अधिक होत आहे. आमच्या सोसायटीत काही डेंगीचेही रुग्ण आढळून आले होते. मात्र, तरीही औषध फवारणी झालेली नाही. आमची महापालिका प्रशासनाकडे मागणी आहे की डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून वारंवार औषध फवारणी आणि साठलेल्या पाण्यात कीटकनाशक पावडर टाकणे यासारख्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अन्यथा डेंगीचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होईल.’’
- शीतल मोरे, रहिवासी, पुनावळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.