निसर्गरम्य पवन मावळाची पुणे-मुंबईकरांना भुरळ
सोमाटणे,ता.२३ ः शांत, निसर्गरम्य वातावरणाबरोबरच गड किल्ल्यांचा ऐतिहासिक परिसर याची भुरळ पुणे-मुंबईकरांना पडली आहे. त्यामुळे, गेल्या दशकांपासून पवन मावळात जमिनी घेण्याकडे धनिकांचा कल वाढला असून परिणामी, पवन मावळात पुण्या-मुंबईप्रमाणे हळूहळू गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.
पवन मावळातील पवनेचे मुबलक पाणी, सुपीक जमीन आदी कारणांमुळे पूर्वी शेतीत चांगले उत्पादन मिळत असे. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचा हा चांगला नफा कमवणारा व्यवसाय होता. त्यामुळे, शेती विकणे ही कल्पनाही शेतकऱ्याच्या मनात कधी आली नव्हती. परंतु, गेल्या एक दशकांपासून हे चित्र बदलू लागले आहे.
प्रगतशील शेतकरी संजूकुमार बोडके व विजय गोपाळे म्हणाले,‘‘बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक आपत्ती वाढू लागल्या आहेत. त्याने, शेती उत्पादनाची हमी राहिली नाही. उत्पादन चांगले झाले; तर शेतमालाला चांगला भाव मिळेल याची खात्री नाही. मजूरांचा तुटवडा तसेच सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात शेतात कष्ट करण्याची इच्छा तरुणांमध्ये राहिली नाही. याचा परिणाम म्हणून शेती करण्यापेक्षा ती विकून व्याजावर आरामात जीवन जगण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे.’’
पवन मावळात पवना, कासारसाई, मळवंडी, आढले, पुसाणे धरणाच्या परिसरातील नैसर्गिक वातावरण, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक परिसराची पुणे-मुंबईकरांची पसंती आहे. त्यातूनच मावळात जमिनी घेण्याकडे धनिकांचा कल वाढला. त्यामुळे, अल्पावधीत जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्या. शहरवासीयांमध्ये ‘सेकंड होम’ घेण्याची ‘क्रेझ’ असल्याची संधी हेरून बांधकाम व्यवसायिक व धनिकांचा ओढा पवन मावळातील जमिनी खरेदीकडे वाढला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेण्याचा सपाटा लावला असून तरुण शेतकऱ्यांनाही जमिनी विक्रीचा चांगला पैसा मिळत असल्याने त्यांचाही कल जमिनी विक्रीकडे वाढला आहे.
याचा परिणाम म्हणून सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे, चांदखेड, बेबडओहोळ आदी गावांत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे जागेच्या कमतरतेअभावी पवन मावळात गुंठे, दोन गुंठे जागा किंवा घर घेण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
जमिनी विकण्यापेक्षा आधुनिक शेती करावी
चांदखेड येथील प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड, साळुंब्रे येथील दिलीप राक्षे, सांगवडे येथील सुरेश राक्षे, आढले येथील नितीन घोटकुले म्हणाले, ‘‘तरुणांनी जमिनी विकण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करावी, शेतीला उद्योगाची जोड देऊन शेतीपूरक व्यवसाय केल्यास जमिनी विकण्याचीही गरज लागणार नाही. भविष्यात शेतीचे मोठे महत्व वाढणार असल्याने तरुणांनी जागे होण्याची गरज आहे.’’
शिरगाव ः सुपीक जमिनीत उभ्या राहिलेल्या गगनचुंबी इमारती.
Smt22Sf1.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.