Pimpri Pollution: उद्योगनगरीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, बांधकामांवरील निर्बंध आदेश मागे; महापालिकेकडून उपाययोजना

Pimpri Pollution: उद्योगनगरीतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, बांधकामांवरील निर्बंध आदेश मागे; महापालिकेकडून उपाययोजना

Published on

पिंपरी, ता. १७ ः शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवावीत, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १३ नोव्हेंबरला दिला होता. तसेच, सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दिवसा व रात्रीची ध्वनी आणि धुळीची पातळीत नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी करून दोषींवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.

परिणामी, शहरातील हवेची प्रदूषण पातळी नियंत्रणात आल्याने निर्बंध मागे घेण्यात येत आहेत. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी उपाययोजना कायमस्वरुपी करण्याचा आदेशही सिंह यांनी शुक्रवारी (ता. १७) दिला.

हवेच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्यावर सूनावणी होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन आखून अंमलबजावणीचे पत्र दिले होते.

त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी १३ नोव्हेंबर रोजी आदेश काढून १९ नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व बांधकामे बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. तसेच, सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दिवसा व रात्रीची ध्वनी आणि धुळीची पातळीत नियंत्रित ठेवावी, अन्यथा प्रतिचौरस मीटर दहा रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला होता.

दरम्यान, शहरात अनेक मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याला अनुसरून शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांना वायू प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार उपाययोजना करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

महापालिकेकडून उपाययोजना
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, महापालिकेस हवेची गुणवत्ता सुधारणे, संरक्षण, पुरवठा आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन उपाय यासाठी निधी मंजूर केला आहे.

महापालिकेच्या राष्ट्रीय शुद्ध हवा अभियानांतर्गत शहर कार्यआराखड्यास (सिटी ॲक्शन प्लॅन) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या दोन वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धुलीकणांचे प्रमाण कमी होणार आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन’ प्रणाली पाच वाहनांवर बसविली असून, ती यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
बांधकामांच्या ठिकाणी व त्यासंबंधिच्या वाहनांवर पाणी शिंपडून, बांधकामे बंद ठेवून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्समध्ये (एक्यूआय) सुधारणा झाली आहे. गेल्या तीन दिवसांत त्यात ‘गंभीर’ पातळीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचे पालन करून बांधकामांवरील बंदी मागे घेण्यात आली आहे.

मात्र, त्या नियमांच्या मर्यादेत राहून काम सुरू करता येऊ शकते. तथापि, महापालिका सावधगिरी बाळगण्याच्या महत्त्वावर जोर देत आहे. त्यानुसार बांधकाम कंपन्यांना हवेच्या गुणवत्तेच्या पातळीबाबत जागरूक राहण्याचा आदेश दिला आहे. एक्यूआय पातळीमध्ये कोणताही बिघाड टाळण्यासाठी योग्य उपायांची अंमलबजावणी सुरू ठेवली पाहिजे. त्यांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय देखरेख ठेवली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी आदेशात म्हटले आहे.

उपाययोजना आवश्यक
- भूखंडाच्या सीमेवर किमान दहा मीटर उंचीचे पत्रे लावणे
- कच्च्या रस्त्यावर धुळीचे प्रदूषण होऊ नये, याचा बंदोबस्त करावा
- चालू बांधकामांना सर्व बाहेरील बाजूस जाळी (टारपोलीन) लावावी
- बांधकाम साहित्य ठेवलेली ठिकाणे व वाहतूक करणारी वाहने ताडपत्रीने झाकावे
- वाहने रस्त्यावर येताना व बांधकाम ठिकाणी जाताना धूळविहरित करावीत
- साहित्य कापताना व ग्राइंडिंग करताना कामगारांना मास्क देणे
- साहित्य कापणे व ग्राइंडिंगची कामे बंदिस्त जागेत करणे
- कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे
- बांधकाम ठिकाणच्या आरएमसी प्लॅंटबाबत परवाना घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविणे
- केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार दिवसा व रात्री ध्वनीपातळी ठेवावी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.