Medical System : पिंपरी शहरातील महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सक्षम
स्वाइन फ्ल्यू, कोरोना, ओमिक्रॉन, इन्फ्लूएंझा एच३एन२ असे विषाणूजन्य आजारांच्या साथींमध्ये महापालिका रुग्णालये उपचारासाठी महत्वाची ठरत आहेत.
पिंपरी - स्वाइन फ्ल्यू, कोरोना, ओमिक्रॉन, इन्फ्लूएंझा एच३एन२ असे विषाणूजन्य आजारांच्या साथींमध्ये महापालिका रुग्णालये उपचारासाठी महत्वाची ठरत आहेत. सद्यःस्थितीत महापालिकेची आठ व खासगी ५८८ असे ५९४ रुग्णालये शहरात असून, त्यांच्या एकूण खाटांची संख्या १० हजार ५८२ आहे. ओमिक्रॉन व एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आठही रुग्णालयांत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. खासगी ७० रुग्णालयांनीही उपचाराबाबत महापालिकेला कळवले आहे. दरम्यान, शहरात सक्रिय रुग्णसंख्या दोनशेच्या जवळपास असून, सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. लक्षणे आढळल्यास रुग्णांनी घाबरून जाऊ नये, त्वरित डॉक्टरांना भेटून औषधे घ्यावीत, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
कोरोना काळात महापालिकेने नवीन थेरगाव, नवीन भोसरी, पिंपरीतील नवीन जिजामाता व आकुर्डीतील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवले आहेत. त्या माध्यमातून ही रुग्णालये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. तसेच, चिंचवडच्या तालेरा रुग्णालयाचा विस्तार केला आहे. नवीन तालेरा अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात ४९ खाटा आहेत. जुनी सांगतील इंदिरा गांधी व निगडीतील यमुनानगर रुग्णालयांत प्रत्येक २० प्रमाणे ४० खाटा आहेत.
वायसीएमची ‘संजीवनी’
वायसीएमच्या आवारात पूर्वीपासून ऑक्सिजन प्लांट आहे. ह्रदयासंबंधीच्या विकारांवर उपचार करण्यासाठी रूबी अलकेअर सेंटर आहे. त्यात आयसीयूच्या ३० खाटा आहेत. त्याव्यतिरिक्त एनआयसीयू (एक वर्षाच्या आतील मुलांचा कक्ष) कक्षात २५ आणि एआयसीयू (एक वर्षावरील व बारा वर्षाखालील मुलांसाठीचा कक्ष) कक्षात पाच अशा ३० आयसीयू खाटा आहेत. मोठ्या व्यक्तींसाठी तीन आयसीयू कक्ष असून, प्रत्येकी १५ प्रमाणे ४५ खाटा आहेत. त्यात व्हेंटिलेटरसह ५३ खाटा आहेत.
रुग्णांनी काय करावे
- ओमिक्रॉन, एच३एन२ विषाणू संसर्गामुळे घाबरून जाऊ नये
- लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
- साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा
- पौष्टिक आहार घ्या
- धूम्रपान व मद्यपान टाळा
- पुरेशी झोप व विश्रांती घ्या
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या खा
- नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
- आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा
ओमिक्रॉन, एच३एन२ यांसह सर्व आजारांवर महापालिकेच्या सर्व दवाखाने व रुग्णालयांमध्ये औषधोपचार उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे असल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या महापालिका दवाखान्यात किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभागप्रमुख, महापालिका
माझ्या मुलाला सर्दी, खोकला व ताप होता. दवाखान्यात घेऊन गेले. त्याचा ताप १०२ वर होता. डॉक्टरांनी औषधे दिली. व्हायरल आहे असे सांगितले. पण, ताप सारखा कमी-जास्त होत होता. त्यामुळे मनात भीती होती. तीन दिवसांनी त्याला बरं वाटू लागले. आणखी दोन दिवस घरीच आराम करायला लावला. नंतर त्याला शाळेत पाठवले.
- लक्ष्मी डाखोरकर, चऱ्होली
महापालिका रुग्णालये
रुग्णालय / एकूण खाटा / आयसीयू
वायसीएम / ७५० / ११३
आकुर्डी / १३० / २४
पिंपरी / १२० / २२
थेरगाव / ४०० / ३२
भोसरी / १०० / १६
यमुनानगर / २० / ...
तालेरा चिंचवड / ४९ / ...
सांगवी / २० / ...
महापालिका वैद्यकीय यंत्रणा
दवाखाने / २८
रुग्णालये / ८
आरोग्य सेवा केंद्र / २०
कुटुंब नियोजन केंद्र / ८
लसीकरण केंद्र / ३६
शहरातील रुग्णालये व खाटांची संख्या
प्रकार / रुग्णालये / खाटा
महापालिका / ८ / १,५८९
खासगी / ५८८ / ८,९९३
एकूण / ५९६ / १०,५८२
महापालिका रुग्णालयातील रुग्ण (सरासरी)
प्रकार / प्रतिदिन / वार्षिक
बाह्यरुग्ण / २,३५४/ ८,५९,३६२
आंतररुग्ण / १०१ / ३६,९५४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.