mahesh-landge
mahesh-landgesakal

Pimpri-Chinchwad : लांडगे-काटे की जगताप, भाजप शहराध्यक्षपदाबाबत उत्सुकता

राज्यातील अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
Published on
Summary

राज्यातील अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

- जयंत जाधव

पिंपरी - राज्यातील अनेक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. कारण, भाजपमध्ये संघटनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे किंवा मानले जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कोणाला संधी मिळणार, या बाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह भाजप परिवारातील दिग्गजांच्याही नजरा लागल्या आहेत.

शहर भाजपचे विद्यमान अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपला आहे. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुखपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड शहर संघटनेचा आढावा घेतला. त्यामध्ये संघटन सरचिटणीस, चिटणीस यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

कारण कागदावरील संघटना आणि प्रत्यक्षात सक्रिय असलेली संघटना यामध्ये फरक असून, संघटना सक्षम असल्याशिवाय निवडणुका लढविणे कठीणच, असे सूत्र आहे. सद्यःस्थितीला शहरातून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आणि विद्यमान संघटन सरचिटणीस अमोल थोरात अशी चार नावे प्रमुख इच्छुक किंवा दावेदार म्हणून समोर येत आहेत.

दुसऱ्या बाजूला विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांना मुदतवाढ दिली जावी, असाही सूर शहर भाजपमध्ये ऐकायला मिळतो. पवार कुटुंबीयांचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा संघटनात्मक प्रमुख नियुक्त करताना सर्व बाजूंचा विचार केला पाहिजे, असा दावा केला जातो. केवळ निष्ठाच नाही, तर प्रसंगी साम, दाम, दंड, भेद अशी सर्व आयुधे वापरून २०१७ च्या विजयाची पुनरावृत्ती करणारा शहराध्यक्ष मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहर भाजपमध्ये निष्ठावंत, जुना, नवा असे गट-तट आहेत. त्यात आता जगताप गट, लांडगे गट अशी विभागणीही आहे. जगताप समर्थकांमध्ये आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप असे पोटगट आहेत. त्यामुळे जुन्या गटाकडून सदाशिव खाडे आणि अमोल थोरात यांची नावे चर्चेत आहे. महत्त्वाचे म्हणजे, बारामतीच्या पवारांचा राजकीय हल्ला परतवून लावत आव्हान पेलण्याची राजकीय क्षमता या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. मग, येथील पदाधिकाऱ्यांमध्ये काही बदलणार का, यावर आगामी निवडणुकांचे चित्र अवलंबून राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शत्रुघ्न काटे यांची महत्त्वाकांक्षा

माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत भाजपत गेल्यानंतर महापालिकेतील पदवाटपात नाराज असल्याबाबत भाजप सत्ताकाळात वारंवार चर्चा होती. महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांसाठी काटे यांनी ‘लॉबिंग’ केले होते. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काटे यांच्या प्रभागातच जगताप यांना कमी मतदान झाले, ही वस्तुस्थिती आहे.

शत्रुघ्न काटे भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे शहराध्यक्षपदी संधी मिळाल्यास २०२४ मध्ये शत्रुघ्न काटे विधानसभा निवडणुकीसाठी ‘दावेदार’ राहणार आहेत. त्यामुळे अश्विनी जगताप, शंकर जगताप की शत्रुघ्न काटे असे तीन पर्याय भाजपसमोर राहणार आहेत. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांना शहराध्यपदी संधी मिळाल्यास सर्वाधिक डोकेदुखी जगताप कुटुंबीयांची वाढणार आहे.

शंकर जगताप यांना संधी मिळणार का?

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हयातीत चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यावर सोपवली होती. पक्षाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत शंकर जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात मोट बांधली. पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यावेळी भाजपाच्या तिकिटाचे दावेदार शंकर जगताप हेच राहतील, हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, स्थानिक अतिमहत्त्वाकांक्षी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी शंकर जगताप यांचा ‘वारू’ रोखला. जगताप यांना उमेदवारी दिल्यास अपेक्षित यश मिळणार नाही, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. अश्‍विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. पण, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वातावरण फिरले.

महाविकास आघाडीचे पारडे जड वाटू लागले. त्यावेळी शंकर जगताप यांनी अखेर ‘जगताप पॅटर्न’ राबवला. निवडणुकीचे अचूक नियोजन केले आणि विजयश्री खेचून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी तिकीट निश्चित करताना शंकर जगताप यांच्याशी केलेली चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार की, पुन्हा तोंडाला पाने पुसली जाणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो.

महेश लांडगे हाच प्रभावी चेहरा

विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपला आहे. अत्यंत आक्रमक असलेल्या आमदार लांडगे यांनी संघटनात्मक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर संयमाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मात्र, गट-तट आणि असंतुष्ट प्रवृत्तीचा त्यांना त्रास सहन करावा लागला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या हातातील सत्ता खेचून आणली.

मात्र, भाजपच्या ‘लाभार्थीं’चा मनधरणी करताना दोन्ही नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबीयांशी थेटपणे दोन हात करून भाजपचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी लांडगे यांना शहराध्यक्षपदी मुदतवाढ मिळावी, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु, आमदार लांडगे यांना राज्यात मंत्रिपदावर संधी मिळण्याबाबत चर्चा असून, त्यांच्याकडे मोठी जबाबदारी मिळेल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत लांडगे प्रभावीपणे शहरात काम करतील आणि भाजपला शहरात सत्ता स्थापन करता येईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.