HSC Result : पिंपरी शहराचा निकाल ९४ टक्के; सोशल मीडियावर जल्लोष, यंदा ९७.७७ टक्के मुलांनी मारली बाजी
पिंपरी - शहराचा बारावीचा निकाल ९४. ४४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल घटला आहे. यंदा ९७. ७७ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. बारावीचा निकाल गुरुवारी (ता. २५) ऑनलाइन जाहीर झाला.
निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केला. एकमेकांना शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यश मित्र-मैत्रिणींबरोबर ‘सेलिब्रेट’ केले. कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना हस्तांदोलन करून यशाच्या शुभेच्छा दिल्या. हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता.
पिंपरी चिंचवडचा ९४.४४ टक्के निकाल लागला असून, गतवर्षी ९४. ६४ टक्के निकाल होता. त्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे. यंदा २३ शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली, तर दुसरीकडे भूमकर चौकातील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजने सर्वाधिक कमी ७७.७७ टक्के मिळविले आहेत. शहरातून १८ हजार ७६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. नऊ हजार ६०० मुले, तर ८ हजार ४७६ अशी संख्या होती.
९ हजार ५३८ मुले, तर ८ हजार ४३७ असे एकूण १७ हजार ९७५ विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८४९ मुले आणि ८ हजार १२७ मुली असे मिळून १६ हजार ९७६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९७.७७ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. ९६.३२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
चिंतामणी रात्रप्रशालेच्या निकालात घट
चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशालेच्या निकालात कमालीची घट झाली आहे. गेल्यावर्षी ९०.४७ टक्के मिळविले होते. यावर्षी ६२.५० टक्के प्राप्त केले आहे. गेल्यावर्षी २१ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने ‘फर्स्ट क्लास’ मिळविला असून १४ जणांनी ५० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले होते. यावर्षी फक्त एका विद्यार्थ्याने ‘फर्स्ट क्लास’ मिळविला आहे. ९ पैकी ५ विद्यार्थी पास झाले आहेत.
शिक्षक संपाचा परिणाम नाही
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारीमध्ये बारावी परीक्षा घेण्यात आली होती. गेल्यावर्षी ८ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी अनेक शिक्षक संपावर गेले होते. पण त्याचा कुठलाही परिणाम उत्तरपत्रिका तपासणी झाला नसल्याचे निकालावरून दिसून येत आहे. बहुतांश पालक आणि मुलांनी घरातच बसून मोबाईल, लॅपटॉपवर निकाल पाहिला.
सोशल मिडियावर जल्लोष
बारावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत काहींनी आपला सेल्फीही फेसबुकवर अपलोड केला, तर काहींनी व्हॉट्सॲपवरून आप्तेष्ट आणि मित्र-मैत्रिणींना बारावीच्या निकालाची आनंदवार्ता दिली. सुटीसाठी गावी गेलेल्या मित्र-मैत्रिणींनी बारावीच्या निकालाची वार्ता फेसबुक, व्हॉट्सऍप, हाईक आणि इंस्टाग्रामवरून आपल्या मित्र-मैत्रिणींना कळवली. काहींनी पेढे वाटताना, हस्तांदोलन करताना आणि शुभेच्छा घेतानाचे छायाचित्र पोस्ट करत बारावीच्या परीक्षेत यश मिळवल्याचा आनंद साजरा केला. उत्सुकता, आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे एक वेगळेच समीकरण सोशल नेटवर्किंग साइट्सवर पाहायला मिळाले.
१२ वर्षातील निकाल
वर्ष / टक्केवारी
२०१२ - ७४.४६
२०१३ - ७९-९५
२०१४ - ९०.०३
२०१५ - ९१.२६
२०१६ - ८६-६०
२०१७ -९३.३७
२०१८- ९३.३४
२०१९ - ८९.०९
२०२० -९३.५३
२०२१ -९९.८६
२०२२-९४.६४
२०२३-९४.४४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.