Pimpri Crime : किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याचा कट उघडकीस; चार पिस्तुलासह दोन संशयितांना अटक
पिंपरी - किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूलही हस्तगत केली आहेत. त्यामुळे संशयित आरोपींचा कट उधळला आहे. पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली. या अटकसत्रानंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रमोद सोपान सांडभोर (वय- ३३, रा. हरणेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे) आणि शरद मुरलीधर साळवे (वय-३०, रा. धनगर बाबा मंदिरामागे, काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, इतर तिघेजण अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या मोटारीमध्ये तळेगाव दाभाडे एसटी स्टँड परिसरात फिरत होते. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी याला अटक केली. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता, त्यांना चार पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत.
आरोपी हे जनसेवा विकास समितीचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांचे जवळचे असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे आरोपी आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच नियोजन करीत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या नियोजनामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
भानू खळदे फरारच
जनसेवा विकास समितीचे संस्थापक-अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारात १२ मे रोजी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावे गुन्ह्यामध्ये सहभागी करण्यात आली होती.
मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात जनसेवा विकास समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे आणि त्यांचा मुलगा गौरव खळदे याचे नाव समोर आले. पोलिसांनी गौरव याला यापूर्वीच अटक केली आहे. मात्र भानू खळदे हा अद्याप फरार आहे.
आमदार शेळके भेटले आयुक्तांना
किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल मागवल्याने मावळमधील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी नेमके कोणाचा खून करून बदला घेणार होते, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पोलिस आयुक्तालयात येऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत आणखीनच वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.