वेदना उपचारांमध्ये मानसशास्त्र ठरतेय फायदेशीर जागतिक मन आणि शरीर आरोग्य दिन विशेष
पिंपरी, ता. १ ः सध्याची बदललेली जीवनशैली व ताण हे बहुतांश शारीरिक दुखण्याचे मूळ कारण ठरत आहे. हेच लक्षात घेऊन, वेदनेवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ मानसशास्त्राची मदत घेत आहेत. त्याद्वारे केले जाणारे उपचार हे परिपूर्ण ठरत असून, त्यामुळे रुग्णांना शारीरिक वेदनेपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळत आहे. ३ जानेवारी हा जागतिक मन आणि शरीर आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक स्थितीमुळे उद्भवणारी शारीरिक वेदना व त्याचे शरीरावरील दुष्परिणाम हे या अनुषंगाने अधोरेखित होत आहेत.
वेदना व्यवस्थापन
शरीरातील कोणत्याही वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी ‘वेदना व्यवस्थापन’ ही उपचारपद्धती सध्या प्रभावी ठरत आहे. यामध्ये केवळ वेदनाशामक गोळ्या न देता, संबंधित रुग्णांची मानसिक स्थिती, जीवनशैली, कार्यालयाच्या वेळी, कामाचे स्वरूप याची सखोल माहिती घेतली जाते. त्यातूनच वेदनेशी संबंधित अनेक आजारांचे मूळ हे ताण तणाव, नैराश्य हे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर केवळ औषधोपचार न करता समग्र दृष्टिकोन ठेवून वेदना व्यवस्थापनाद्वारे उपचार केले जातात. ज्यात ८० टक्के उपचार मानसिक स्थितीवर तर २० टक्के शारीरिक वेदनेवर केले जातात. वेदना व्यवस्थापनात मान, पाठ, कंबर, डोके ,गुडघेदुखी, ओटीपोटाचे दुखणे, खांदादुखी यावर विनाशस्त्रक्रिया उपचार केले जातात.
वेदना व मानसिक स्थिती
अनेकदा पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी आदी आजारांमुळे अनेक रुग्ण हे वर्षानुवर्षे बेजार असतात. अनेकदा सिटी स्कॅन, एमआरआय व रक्ताच्या चाचण्या करूनही त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. अशा वेदनेचा मानसिक स्थितीशी संबंध असू शकतो. त्याचप्रमाणे शरीराच्या कोणत्याही प्रदीर्घ वेदनेचा परिणाम मानसिक स्थितीवरही होतो. वेदनेबरोबरच रुग्णांमध्ये नकारात्मक भावना यायला सुरवात होते. ज्यामुळे आजाराची तीव्रता वाढते. अशा वेळी त्या रुग्णाची मानसिक स्थिती, जीवनशैली याचा अभ्यास केला जातो व त्यातून उपचाराची दिशा ठरवली जाते. असे वेदना व्यवस्थापन शाखेतील तज्ज्ञ सांगतात.
अशी ठेवा जीवनशैली
नियमित योगा किंवा व्यायाम करा
आनंदी व तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा
तात्पुरता उपाय म्हणून वेदनाशामक गोळ्या घेऊ नका
कुटुंबीयांना वेळ द्या
पुरेशी झोप घ्या
कामाचे तास व स्वरूपानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा.
वेदनेशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
‘‘शरीर हे आपल्याला निसर्गाने दिलेले वरदान आहे. मात्र, आपण याकडे दुर्लक्ष करत आहोत. शारीरिक वेदनेशी संबंधित बहुतांश आजाराचे कारण हे मानसिक ताण तणाव हे असते. सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच वयोगटात ही समस्या उद्भवत आहे. त्यावर उपचार करण्यासाठी मानसशास्त्राचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे मन व शरीर यांचे आरोग्य जपणे ही काळाची गरज बनली आहे.
- डॉ. वर्षा कुऱ्हाडे, वेदना व्यवस्थापन तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.