मंदिरांची सजावट, फुलांचा वर्षाव अन् मिरवणुका शहरात रामनवमीनिमित्त उत्साह, भाविकांच्या गर्दीने मंदिरे फुलली
पिंपरी, ता. १७ ः शहरातील राम मंदिरांना करण्यात आलेली सजावट, पारंपारिक वेशभूषा धारण केलेल्या नागरिकांनी फुलून गेलेला मंदिर परिसर, ठिकठिकाणी सुरू असलेली कीर्तनसेवा, बरोबर १२.३० वाजता श्री राम जन्म झाल्यानंतर झालेला फुलांचा वर्षाव व महिलांनी गायलेला पाळणा व सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका अशा वातावरणात बुधवारी (ता. १७) शहरात रामनवमी साजरी करण्यात आली.
चिंचवडमध्ये रामनवमी उत्सव
चिंचवड येथील पुरातन राम मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राम मंदिराला फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहाला मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर परिसरातील विविध भजनी मंडळांनी या ठिकाणी आपली भजनसेवा सादर केली. मानसीताई बडवे यांचे रामजन्माचे कीर्तन व त्यानंतर राम जन्माचा सोहळा पार पडला. सकाळपासूनच मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी राम जन्माचा पाळणादेखील सादर केला. आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी रामरक्षा व हनुमान स्त्रोताचे पठण पार पडले. यानंतर गायक उदय कुलकर्णी यांनी गीतरामायण सादर केले. या कार्यक्रमालाही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामनवमी उत्सवादरम्यान मंदिरात रोज सांप्रदायिक आरतीचे आयोजन केले जाते. उन्हाच्या तडाख्यामुळे येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात मांडव घालण्यात आला होता.
भोसरीत बाईक रॅली
भोसरी येथे श्रीराम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कविता भोंगळे युवा मंच व सागर गवळी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यास मिळाला. भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमधील प्रभू श्रीराम मंदिर येथून रॅलीला सुरवात करण्यात झाली. आळंदी रोड, दिघी रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे भोसरी येथील पीएमटी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये विविध तरुण मंडळे, पहिलवान ग्रुप, ज्येष्ठ नागरिक, कामगार संघटनेचे नेते, माथाडी कामगार संघटना ज्येष्ठांसोबतच चिमुकल्यांनीदेखील सहभाग घेतला होता.
पुनावळेतील राममंदिरात कीर्तन सप्ताह
पुनावळे श्रीराम मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते १७ एप्रिल दरम्यान आयोजित या हरिनाम सप्ताहामध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. पहाटे पाच वाजता काकड आरती व महापूजा झाली. त्यानंतर गौतम महाराज बेलगावकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. रामजन्मासाठी परिसरातील शेकडो भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. आलेल्या भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी सकाळी महावीर महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल, अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने देण्यात आली.
असाही रामजन्मोत्सव
मोशी येथील पूजा पार्कमध्ये राहणारे विश्वास समुद्र व कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून आपल्या घरात राम जन्मोत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करतात. बुधवारी सकाळी पवनाभिषेक, श्रीराम जन्म अध्याय वाचन, पाळणा, श्रीराम जन्म व आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित देखावा सादर करण्यात आला. यावर्षी देखाव्यात अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती व श्रीराम मंदिर लढ्यापासून ते निर्माण पर्यंत ज्या रामदुतांनी सहकार्य केले, त्यांचे स्मरण करण्यात आले. सायंकाळी वंदना इनानी यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. या राम मंदिराची निर्मिती यश समुद्र, प्रत्यंच्या समुद्र व स्वाती समुद्र यांनी केली.
फोटोः 14392, 14391, 14390
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.