चिंचवड-डांगे चौक रस्त्याचे खुलणार सौंदर्य
महापालिका आयुक्तांच्या हस्ते भूमिपूजन; अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार होणार काम

चिंचवड-डांगे चौक रस्त्याचे खुलणार सौंदर्य महापालिका आयुक्तांच्या हस्ते भूमिपूजन; अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार होणार काम

Published on

पिंपरी, ता. १५ ः पवना नदीवरील चिंचवड व थेरगाव येथील पूल (बिर्ला हॉस्पिटल) ते डांगे चौक या रस्त्याचे पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार महापालिका विकसित करणार आहे. त्याचे भूमिपूजन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्ता हिंजवडी आयटी पार्क आणि भोसरी-चिंचवड ‘एमआयडीसी’ला जोडणारा आहे. विकास आराखड्यातील ३४.५ मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता औंध-रावेत या ४५ मीटर रुंदीच्या बीआरटीएस रस्त्याला जोडणारा फिडर रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीही होते. ती सोडविण्यासाठी अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ता विकास करणे गरजेचे आहे. याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे, असा दावा महापालिका सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केला. कामाच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

अशा असतील सुविधा
- पदपथ व स्वतंत्र सायकल मार्ग असेल
- रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी दगडी आसने
- पदपथाच्या बाजूला ओपन जिम साहित्य
- म्युरल्सच्या माध्यमातून सौंदर्यीकरण
- रात्री दृश्यमानतेसाठी अत्याधुनिक पथदिवे असतील

‘‘शहरातील मुख्य रस्त्यांचा विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार करण्यात येत आहे. यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होऊन वर्दळ कमी होण्यासही मदत होत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन काम करत असते. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पदपथांवर किंवा रस्त्यावर वर्दळ होईल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये. तसेच, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, शहराच्या विकासात हातभार लावणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक रस्त्यावर वाहने व पादचाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी हा रस्ता अर्बन स्ट्रीट स्केपनुसार विकसित केला जाणार आहे. सुशोभिकरणाबरोबरच वाहतूक सुरळीत होऊन पादचारी, सायकलस्वार आणि वाहनचालकांना सुलभ व सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच, अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार पदपथ विकसित केल्याने सायकल व पादचारी मार्ग आणि वाहनतळ या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.