जागतिक अपंग दिन विशेष दिव्यांगांच्या प्रगतीसाठी ‘आपुलकी’चे प्रयत्न व्हॉटस ॲप ग्रुप ते हजारो व्यक्तीची भक्कम आधार बनलेली समाजसेवी संस्था
बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. २ : सोशल मीडियाचा योग्य वापर करून, दिव्यांग बांधवांनी अशक्य अशी गोष्ट करून समाजाला स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे. व्हॉटसॲपमुळे जोडले गेलेल्या दिव्यांगांनी ग्रुपचे रूपांतर ‘आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन’ या समाजसेवी संस्थेत केले अन भल्या-भल्यांना जमणार नाहीत, अशा विधायक कामांचा धडाका लावला.
या सर्वाच्या मागे विजय पगडे नावाच्या दिव्यांग तरुणाचा प्रेरणादायी चेहरा आहे. पाचशेहून अधिक दिव्यांग बांधवांची एकत्रित मोट बांधून, त्यांना आशावादी बनवणारा विजय होय. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कागदपत्रे, दाखले मिळवून देण्यासाठी कायम झटणाऱ्या विजयने आजवर दीड हजाराहून अधिक बांधवांना रजिस्ट्रेशन करून युडीआयडी कार्ड मिळवून दिले. त्यासह संजय गांधी अनुदान योजना, पुणे जिल्हा परिषदेचा निर्वाह भत्ता, पेन्शन योजना मिळवून देणे, दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा भरविणे अशी अनेक कामे करत असताना विजयाचा संग्रह वाढत गेला.
सुरवातीला चाकण येथे छोटासा स्नेहमेळावा झाला. तो यशस्वी झाल्याने दिव्यांग सहल गेली आणि यातूनच प्रेरणा घेत सर्वांनी एकत्र येत आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशनची स्थापना केली. भोसरीतील गुळवे वस्ती येथे फाउंडेशनचे नवीन कार्यालय नावारूपाला आले आहे. आता आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन संचलित, अंकुर दिव्यांग स्वयं साहाय्यता बचत गट, स्पंदन स्पेशल चाइल्ड अँड डेव्हलपमेंट सेंटर आणि एम्पायर दिव्यांग उद्योग समूह इत्यादी विभागात विस्तार झाला आहे. अंकुर दिव्यांग स्वयं सहायता बचत गटात महिन्याला ६० हजार रुपयांची बचत जमा होत आहे. स्पंदनमध्ये पंधरा विशेष मुलांना शिक्षण व थेरपी दिली जात आहे.
विविध घरगुती वस्तू बनविण्याच्या कामाला सुरवात झाली असून, दहा जणांना नोकरी देखील मिळाली आहे. बँकेत जमलेल्या बचतीवर शासकीय अनुदान व कर्ज मिळवून उद्योग समूहाचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपुलकी नावाने अनेक घरगुती प्रॉडक्ट्स बाजारपेठेत आणण्याची तयारी आहे. त्यामुळे हजारो दिव्यांग बांधवांना रोजगारासाठी कोणापुढेही हात न पसरता स्वतःचा हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असून, स्वाभिमानाने जगता येणार आहे. ही सर्व धडपड करताना अनेक अडचणींवर मात करत आम्हा दिव्यांग बांधवांची घौडदौड सुरू आहे, असे फाउंडेशनच्या सदस्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
प्रतिक्रिया
‘‘नैराश्यातून एका दिव्यांग बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा दिव्यांगच त्याच्या मदतीला धावले. सर्वांनी त्या वैफल्यग्रस्ताला सावरले. त्याचे पुनर्वसन केले. यातूनच दिव्यांगांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी फाउंडेशनची स्थापना केली. दिव्यांग बचत गट बनवले. विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डे केअर सेंटर सुरु केले. लवकरच दिव्यांग उद्योग समूह सुरु करणार आहे.
- विजय पगडे, संस्थापक अध्यक्ष, आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन
फोटोः 05265, 05266, 05267
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.