Pimpri News : बेशिस्तीमुळेच ‘कोंडी’

पिंपरी शहरातील स्थिती; रस्ते मोठे असूनही समस्याही मोठी
traffic jam
traffic jamsakal
Updated on

पिंपरी : प्रशस्त रस्त्यांबाबत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीची नेहमीच पुण्याशी तुलना केली जाते. मात्र, शहरातील हेच प्रशस्त रस्ते आता डोकेदुखी ठरत आहेत. कारण या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) सुरू असोत की पोलिसांसह चौकाचौकांत उभे असलेले वॉर्डन, त्यांना न जुमानता पुढे जाण्याच्या नादात वाहने आडवी, तिरपी चालविणाऱ्या बेशिस्त चालकांमुळे कोंडी होत आहे.

त्यामुळे दिवसभर घराबाहेर असलेले विद्यार्थी, नोकरदारांसह सर्वांचीच घरी जाण्याची वाट बिकट होत आहे.

मुंबई-पुणे महामार्ग (निगडी ते दापोडी); औंध- काळेवाडी फाटा- डांगे चौक थेरगाव- ताथवडे- पुनावळे- रावेत; आळंदी- मोशी- चिखली- तळवडे- देहू; आळंदी- चऱ्होली फाटा- चोविसावाडी- वडमुखवाडी- दिघी; भोसरी- केएसबी चौक- निगडी टेल्को रस्ता; मोशीतील राजे शिवछत्रपती चौक- निगडीतील भक्तीशक्ती चौक स्पाइन रस्ता; काळेवाडी फाटा- चिखली बीआरटी मार्ग (देहू-आळंदी रस्ता); केएसबी चौक- चिंचवड स्टेशन- चापेकर चौक- डांगे चौक- भूमकर चौक वाकड- हिंजवडी; नाशिक फाटा- पिंपळे सौदागर- वाकड या रस्त्यांचे रुंदीकरण महापालिकेने केले आहे.

शिवाय, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गही चारपदरी आहे. काही ठिकाणी दोन्ही बाजूस सेवा रस्ताही तयार आहे. पिंपळे गुरव- नवी सांगवी- जुनी सांगवी; पिंपरी चौक- शगून चौक- काळेवाडी; चिखली- साने चौक- कृष्णानगर- थरमॅक्स चौक- आकुर्डी खंडोबा माळ; भक्ती-शक्ती चौक- प्राधिकरण- वाल्हेकरवाडी असे काही अंतर्गत रस्तेही मोठे आहेत.

त्या रस्त्यांवरही वाहतूक नियंत्रक दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालक वाहने दामटतात.

1) आळंदी-पुणे पालखी मार्ग काळे कॉलनीपासून दिघीपर्यंत आठपदरी आहे. बीआरटी मार्ग, मुख्य रस्ता, सेवारस्ता, पदपथ आहेत. तरीही संध्याकाळी पाचनंतर या रस्त्यावर वारंवार कोंडी होत असते. काळे कॉलनीपासून देहू फाटा- आळंदीपर्यंत दुहेरी मार्ग असल्याने कोंडीत आणखी भर पडते.

या रस्त्यावर भोसरीतून मॅगझीन चौकात, नाशिक महामार्गावरील राजेशिवछत्रपती चौकातून वडमुखवाडी; मोशीतून देहू फाटा आळंदी, मरकळ एमआयडीसीकडून दाभाडे वस्तीतून चऱ्होली फाटा येथे वाहने येतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा ते आठ अशी सुमारे दोन तास कोंडी झाली होती.

2) पुणे-नाशिक महामार्गावर गुडविल चौक, लांडेवाडी चौक, राजेशिवछत्रपती चौक, मोशी गावठाण चौक, भारतमाता चौक आदी ठिकाणी कोंडी होते. भोसरीतील चांदणी चौक, पीएमटी चौक व आळंदी रोड कॉर्नर येथे नेहमी कोंडी होत होती.

राजमाता जिजाऊ उड्डाणपुलामुळे महामार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांची सोय झाली. मात्र आळंदी, दिघी, विश्रांतवाडी परिसरात जाणाऱ्या वाहनांमुळे व पीएमपी बसस्थानकामुळे महामार्गावर कोंडी होते.

हीच स्थिती आळंदी रस्ता, दिघी रस्त्याचीही असते. फेरीवाले, पथारीवाले, हातगाडी वाल्यांमुळे सेवा रस्ता अधिक अरुंद होऊन कोंडीत भर पडते.

3) पुणे-नाशिक महामार्गावर राजेशिवछत्रपती चौकातील वाहतूक नियंत्रक पोलिस अधिकारी, कर्मचारी व वॉर्डन तैनात होते. वाहतूक नियंत्रक दिव्यांकडे आणि पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वाहने दामटली जात होती.

एका बाजूची वाहने जाऊ दिली जात असताना अन्य तीन बाजूकडील वाहनचालकांनी थांबणे गरजेचे होते. पोलिस अधिकारी समोर उभे असतानाही जोरजोरात हॉर्न वाजवून वाहने पुढे घेत चालक जात होते.

नियमानुसार सिग्नलला थांबलेल्या चालकाला ‘ये चल’ म्हणत व अपशब्द वापरत बेशिस्तीचा कहर सोमवारी सायंकाळी दिसून आला.

4) आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या परिसरात बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाचच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. या भागातून धर्मराज चौकातून भोंडवे कॉर्नर मार्गे रावेत, पुनावळे, थेरगाव, हिंजवडीकडे जाता येते.

भोंडवे कॉर्नर मार्गे शिंदे वस्ती पुलाखालून किवळे व द्रुतगती मार्गावर जाता येते. गुरुद्वारा रोड मार्गे वाल्हेकरवाडी, बिजलीनगर चिंचवड व पिंपरीकडे जाता येते.

प्राधिकरणातून भक्तीशक्ती चौक मार्गे किंवा म्हाळसाकांत चौक मार्गे मुंबई-पुणे महामार्गासह शहराच्या पूर्वभागात जाता येत असल्याने लोहमार्गाखालील भुयारी मार्ग असूनही त्याचा वापर केला जातो. त्यामुळे अधिक कोंडी होते.

बेशिस्त वाहनचालकांमुळेच सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक पोलिस, वॉर्डन चौकांत उभे असतात. त्यांची नजर चुकवून ते निघून जातात.

- विशाल गायकवाड, पोलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.