विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना करावा लागतोय जगण्यासाठी संघर्ष!

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना करावा लागतोय जगण्यासाठी संघर्ष!
Updated on

पिंपरी : सुजाण नागरिक घडविण्यात महत्वाची भूमिका बजावतात ते शिक्षक. मात्र, लॉकडाउनुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विनाअनुदानित शाळांमधील सुमारे साडेआठ हजार शिक्षकांचा जगण्याचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे आम्हाला वाली कोण, असा प्रश्‍न ते उपस्थित करीत आहेत. 

ज्या संस्थाचालकांना सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय शिक्षणसंस्था सुरू करायची आहे. त्यांना कायम विनाअनुदानित तत्वावर शिक्षणसंस्था सुरू करण्यास सरकारच्या वतीने मान्यता देण्यात येते. यानुसार अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे शिक्षणसंस्था सुरु केल्या. या संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक आणि अन्य कर्मचारीही विनाअनुदानित तत्वावर काम करीत असतात. काही संस्थाचालक या शिक्षकांना कागदोपत्री जास्त पगारावर सही घेतात आणि प्रत्यक्षात खूपच कमी पगार देतात. मात्र, पर्याय नसल्याने आणि दुसरी नोकरी मिळविण्यासाठी अनुभवाची गरज असल्याने अनेकजण मुकाटपणे अशी नोकरी करतात.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधारणपणे या शिक्षकांना दहा ते 20 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. त्यातही काहींनी शाळेची पतपेढी वा अन्य ठिकाणहून कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते कापून उरलेल्या पैशात ते घर चालवितात. प्राधिकरणातील एका शिक्षकाला अठरा हजार रुपये वेतन आहे. त्याच्या वेतनात 40 टक्के कपात झाली आहे. शैक्षणिक संस्थेने त्याच्याकडून घेतलेल्या कर्जाचा आठ ते नऊ हजार रुपयांचा हप्ताही कापून घेतला. त्यामुळे त्या शिक्षकाच्या हातात केवळ एक हजार रुपये आले. या एक हजार रुपयात घर कसे चालवायचे, असा प्रश्‍न या शिक्षकासमोर आहे. अशाच पद्धतीच्या अनेक शिक्षकांच्या समस्या आहेत. 

काय आहे समस्या 

विनाअनुदानित शाळांमध्ये मुळातच वेतन कमी असते. विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या 'फि'च्या पैशातून या शैक्षणिक संस्था चालविण्यात येतात. या संस्थांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोतही हाच असतो. काही शाळांना राजकीय नेते, मोठ्या कंपन्या आर्थिक मदत करतात. मात्र, लॉकडाउनमुळे हे सर्वच थांबले आहे. शाळाही बंद असल्याने पालकांकडून फि मिळालेली नाही. त्यामुळे या शिक्षकांचे वेतन करायचे कसे, असा प्रश्‍न या संस्थाचालकांपुढे आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही संस्थाचालकांचे अन्य व्यवसायही आहेत. त्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी शिक्षकांचे वेतन केले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शिक्षकांचे वेतन पूर्णपणे दिले जावे, अशी सूचना लॉकडाउनपूर्वी संस्थाचालकांना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली होती. लॉकडाउनच्या कालावधीत संस्थाचालकांनी पूर्ण वेतन दिले नसल्याच्या तोंडी तक्रारी काही शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. 

आकडे बोलतात 

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विनाअनुदानित शाळांची संख्या - 776 
  • या शाळांमधील पुरुष शिक्षकांची संख्या - 4956 
  • या शाळांमधील पुरुष शिक्षकांची संख्या - 3488 
  • शिक्षकांची एकूण संख्या - 8,444 

सरकारने विनाअनुदानित शिक्षण संस्थांचालकांनी त्यांच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पगार द्यावा, असा आदेश काढला आहे. आम्हाला वेतन देण्यात आले नसल्याच्या तक्रारी, अशा काही शिक्षकांनी केल्या आहेत. तसेच, शिक्षणसंस्थांकडे या बाबत विचारणा केली असता आम्हाला विद्यार्थ्यांकडून फि मिळाली नसल्याने शिक्षकांचा पगार देऊ शकत नसल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. 
- गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.