भारतीय संस्कृती जोपासणारी ‘वुड्सविले सोसायटी’

भारतीय संस्कृती जोपासणारी ‘वुड्सविले सोसायटी’

Published on

श्रावण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मोशी, ता. २५ ः बोऱ्हाडेवाडी येथील वुड्सविले गृहनिर्माण संस्थेत विविध धर्माचे नागरिक एकमेकांचे सण आपुलकीने साजरा करत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. संस्थेत एकूण अकरा इमारती आहेत. या अकरा इमारती मिळून वुड्सविले फेज ३ फेडरेशन या नावाने संस्था आहे. टाटा मोटर्स, सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, साहित्यिक, माजी सैनिक, पोलिस अधिकारी अशा सर्व क्षेत्रातील नागरिक येथे निवास करतात. त्यामुळे सोसायटीत राष्ट्रीय सणांसह वेगवेगळ्या प्रांतातील सर्व सण, उत्सव, संस्कृतीचे दर्शन घडते.

ईकोफ्रेंडली सोसायटी
प्रशस्त आवार, मोकळी हवा आणि स्वच्छ वातावरण यामुळे मुलांच्या अभ्यासाला, खेळायला तसेच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांसाठी पोषक वातावरण आहे. अनेक क्षेत्रातील मंडळी या सोसायटीत असल्याने विविध संस्कृतीसह विचारांची देवाण-घेवाण करता येते.

राष्ट्रीय सण
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या राष्ट्रीय सणांच्यानिमित्त ध्वजवंदन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन व सर्व राष्ट्रीय सण साजरे केले जातात.

शिवजयंती
आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सोसायटीमधील मुलांना योग्य संस्कार आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिकवण मिळण्यासाठी मुलींच्या मर्दानी खेळाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर कोजागरी पोर्णिमा, नववर्ष स्वागत, होळी इत्यादी सर्व उत्सव आनंदाने साजरे केले जातात.

आषाढी वारी
मुलांवर धार्मिक संस्कार व्हावेत, आषाढी वारी काय असते? त्याबाबत माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्या आवारात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ गात वारीचे आयोजन केले जाते.

क्लब हाऊस, व्यायामशाळा, जलतरण तलाव
सभासदांच्या घरातील विविध कार्यक्रमांसाठी भव्य असे क्लब हाऊस, व्यायामासाठी सुसज्ज व्यायामशाळा व जलतरण तलाव आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम
जिजाऊ जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, शिवजयंती, रामनवमी, हनुमान जयंती आदी सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

मुलांसाठी मैदाने
मोबाईलपासून मुले दूर राहावीत, शारीरिक उन्नती व्हावी यासाठी बास्केटबॉल, क्रिकेट कोर्ट, सायकल ट्रॅक, विविध खेळणी आहेत.

गरजूंना मदत
सभासदांकडील वापरत नसलेल्या जुन्या इलेक्ट्रिकल वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, कपडे जर दुसऱ्यांना उपयोगी पडत असतील तर त्याचेही या ठिकाणी गरजूंना वाटप केले जाते.

पाण्याचे योग्य नियोजन
सर्व इमारतींना आणि सदनिका धारकांना योग्य पाणी वापराबद्दलच्या योग्य सूचना दिल्यामुळे सोसायटीमध्ये आतापर्यंत एकदाही टॅंकर लागला नाही.

महिला मंडळ
संस्थेत महिला मंडळ असून महिलांच्या उन्नतीसाठी बचत गट, लघुउद्योग आदींच्या साहाय्याने अर्थार्जनासाठी मदत, भजनी मंडळ असून गणपती आणि नवरात्रामध्ये संगीत भजनाचे कार्यक्रम केले जातात.

चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघ
संस्थेतील सदनिकाधारक ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत चिरतरुण नावाचा एक ज्येष्ठ नागरिक संघ सुरू केला आहे. दररोज हरिपाठ, गणेशोत्सव, नवरात्रीत भजन तसेच धार्मिक, ऐतिहासिक स्थळांवर सहलींचे आयोजन केले जाते.

कचरा व्यवस्थापन
सोसायटीमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत म्हणून सोसायटीमधील गार्डनसाठी वापर केला जातो.

एसटीपी प्लँट
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी एसटीपी प्लँट चालवला जातो. त्या पाण्याचा फ्लश, झाडे आणि मोटारींसाठी पुनर्वापर केला जातो. सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यास परवानगी नाही.

सुरक्षा व्यवस्था
सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सोसायटीच्या संपूर्ण परिसरामध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसविले असून, ते २४ तास निगराणीखाली आहेत.

अग्निशमन व सोलर यंत्रणा
संस्थेमध्ये आगीचा कोणताही प्रकार घडलाच तर अग्निशमन नियंत्रण यंत्रणा सुसज्ज आहे. त्याबरोबरच सोसायटीमधील काही इमारतींवर सोलर यंत्रणा बसविल्याने सोसायटीला येणारे विजेचे बिल त्यामधून भागवले जाते व उर्वरित वीज महावितरणला दिली जाते.

दृष्टीक्षेपात सोसायटी
- कोरोना काळात सोसायटीने नियमांचे काटेकोर पालन करत मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले.
- सोसायटी आणि परिसरामध्ये औषधी व जास्तीत जास्त देशी वृक्ष लागवड व संवर्धनावर सोसायटीचा भर आहे.
- सोसायटीच्या स्वच्छतेला सभासद व रहिवाशांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
- आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, सैनिकांसाठी मदत, वारकऱ्यांसाठी अन्नदान आदी उपक्रम राबविले जातात.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, सुसज्ज वाचनालय सुविधा आहे.
- मुलांना संस्कारित करण्यासाठी, योगासन, कला, संस्कारवर्ग आहेत.

‘‘संस्थेमध्ये विविध जातीधर्माचे सभासद राहत असल्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. अबाल वृद्धांसाठी विविध स्पर्धा, खेळ आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.’’
- प्रमोद वाळुंज, अध्यक्ष, वुड्सविले फेज ३ फेडरेशन

‘‘परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. अंतर्गत औषधी उद्यान, स्वच्छता, सर्वांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात अशाप्रकारे इको फ्रेंडली सोसायटी ठेवण्यासाठी प्रत्येक सदनिकाधारक प्रयत्न करत आहेत. सर्वधर्म समभाव आम्ही जोपासला आहे. सोसायटीतील प्रत्येकजण जागरूक असतो.’’
- निलम मेमाणे, सचिव, वुड्सविले फेज ३ फेडरेशन

‘‘सकाळ माध्यम समुहाने सुरू केलेल्या ‘माझी सोसायटी, माझा उपक्रम’ हे सदर आम्हा सोसायटीधारकांसाठी प्रेरणादायी आहे. आमचीही सोसायटी या सदराप्रमाणे आदर्श करण्यासाठी आणखी उपयोग होणार आहे.’’
- अरुण कोल्हे, खजिनदार, वुड्सविले जे इमारत संस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.