YCM Hospital : शिकाऊ डॉक्टर व प्रशासनाचे जुळेनात सूर

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरांचे मनुष्यबळ कमी पडल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी) सुरू करण्यात आला.
YCM-Hospital
YCM-Hospitalsakal
Updated on

- अश्‍विनी पवार

पिंपरी - यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरांचे मनुष्यबळ कमी पडल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम (पीजी) सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने येथील १३ विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले; पण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या डॉक्टरांचा कल रुग्णसेवेकडे नसल्याचे गेल्या काही महिन्यांपासून निदर्शनास येत आहे.

ज्या हेतूने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला, तो हेतूच साध्य होत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी डॉक्टर व प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

‘वायसीएम’ रुग्णालयात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कधीकाळी इथे येणारा शहरातील मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिक नाइलाजास्तव खासगी रुग्णालयाकडे वळत आहे. या ठिकाणी येणारा बहुतांश वर्ग पिंपरी-चिंचवड, पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यांतील आहे. या रुग्णांना येथील व्यवस्थेबाबत फारशी माहिती नसते.

त्याचाच फायदा घेऊन येथील निवासी डॉक्टर त्यांना इतर खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होण्याविषयी सुचवितात. रुग्णांनाही कोणी अधिकारी किंवा राजकीय नेत्यांच्या शिफारशी शिवाय भरती न करणे, शस्त्रक्रियेसाठी ताटकळत ठेवणे असे प्रकार येथे घडतात. या प्रकारांना आळा बसण्यासाठी येथील प्रशासनानेच कठोर पावले उचलणे आवश्‍यक आहे.

कान टोचले पाहिजेत!

पदव्युत्तर पदवीसाठी आलेले डॉक्टर हे त्यांच्या विभाग प्रमुखांच्या म्हणजेच ‘पीजी’च्या वरिष्ठ प्राध्यापकाच्या हाताखाली असतात. त्यामुळे, ते बऱ्याचवेळा महापालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही ऐकत नाहीत. ‘वायसीएम’ हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत असलेले रुग्णालय असल्याने अनेक गरीब रुग्ण हे आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिफारशींवरून आलेले असतात, अशावेळी त्यांना सामाजिक बांधिलकीतून हाताळणे आणि आवश्यक सेवा देणे गरजेचे असते.

नवीन शिकाऊ डॉक्टरांना ही अत्यंत महत्त्वाची गोष्टच समजत नाही. त्यामुळे, अनेकवेळा रुग्णालयात वादाचे प्रसंग उद्भवतात. वाद झाले की शिकाऊ डॉक्टरांची संघटना लगेच संपाचे हत्यार उपासते. त्यामुळे, या डॉक्टरांना शिस्त कोणी लावायची ? हा खरा प्रश्‍न उपस्थित होतो.

त्यावर उपाय म्हणून विभाग प्रमुखांनीच आपल्या अखत्यारीतील डॉक्टरांना शिस्तीचे व सभ्यतेचे धडे दिले पाहिजेत. विभाग प्रमुखांच्या हातात शिकाऊ डॉक्टरांचे गुणपत्रक असल्याने त्यांनीच आता त्यांचे कान टोचले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘वायसीएम’ रुग्णालय उभारण्यामागचा हेतू ‘रुग्णसेवा’ हा आहे. इथे जरी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला होता, तरी त्यामागेही रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध व्हावेत, हाच हेतू होता; मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. विभाग प्रमुख आणि अधिष्ठाता यांनी मतभेद बाजूला ठेवून याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

- एक निवृत्त आरोग्य अधिकारी

काय करणे आवश्‍यक?...

  • प्रत्येक रुग्णांना योग्य उपचार देऊन नोंद ठेवा

  • सर्व रुग्णांची माहिती ठेवणे गरजेचे

  • ससूनमध्ये किती रुग्णांना पाठविले, उपचाराशिवाय किती रुग्ण गेले, याचीही नोंद हवी

  • ‘कट प्रॅक्टिस’ रोखण्यासाठी कठोर नियम

  • रुग्णालयाचे ऑडिट होणे आवश्‍यक

  • निवासी डॉक्टर, प्राध्यापक यांच्या कामाचे निरीक्षण गरजेचे

  • काही विभागांत कर्मचारी भरती व्हावी

  • रूग्णसेवेवर भर देणाऱ्या अधिष्ठाता व विभाग प्रमुखांची नेमणूक करणे

शिकाऊ डॉक्टर आल्यामुळे रुग्णालयाचे मनुष्यबळ वाढले आहे; मात्र या डॉक्टरांकडून कशी सेवा दिली जाते, हा चौकशीचा भाग आहे. या डॉक्टरांच्या रुग्णसेवेविषयी काही तक्रार असेल, तर संबंधितांनी आम्हाला कळवावे. स्वतःच्या कर्तव्यांविषयी जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. कोणी ‘कट प्रॅक्टिस’ करत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.