- अश्विनी पवार
पिंपरी - प्रसंग एक - मुलीच्या खांद्याला दुखापत झाली म्हणून तिचे पालक तिला घेऊन पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) येतात. सायंकाळची वेळ असल्याने ‘ओपीडी’ऐवजी आपत्कालीन कक्षात जाऊन केसपेपर काढतात. मात्र, अर्धा तास उलटल्यानंतरही कोणी डॉक्टर पेशंटला पाहायला येत नाही.
आधीच रांगेत असलेले पेशंटही हेच सांगतात. बराच वेळ उलटल्यावर डॉक्टर येणार की नाही याबाबत नातेवाईक साशंक होऊन चौकशी करतात. मात्र; आता डॉक्टर नाहीत, उद्या सकाळी, या असे तेथील ड्यूटीवर असणारे शिकाऊ डॉक्टर सांगतात.
प्रसंग दुसरा - कामगाराच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या ओळखीतील काही लोकांनी ‘वायसीएम’ येथे उपचारासाठी आणले. मायनर ऑपरेशन थिएटरमध्ये तासभर वाट पाहूनही कोणीही डॉक्टर जखम बघायला आलेले नाही. बराच वेळानंतर शिकाऊ डॉक्टरांनी जखम पाहिली. मात्र, जखम नक्की किती खोल आहे? फ्रॅक्चर आहे का ? हे न पाहता फक्त ड्रेसिंग करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आलेल्यांनी पाठपुरावा केल्यानंतर रात्री उशिरा संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉक्टरांकडूनच गैरप्रकार
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या ‘वायसीएम’मध्ये रोज अशा अनेक घटना घडत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य व गरजू व्यक्तींना अगदी नाममात्र शुल्कात उत्तम वैद्यकीय सेवा देता यावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात रुग्णांची पिळवणूक केली जात आहे.
आपत्कालीन कक्षात दाखल झालेल्या रुग्णांना पाहण्यासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध न होणे, डॉक्टर उपलब्ध झाले तरी त्यांनी रुग्णाकडे पुरेसे लक्ष न देणे, तातडीचे वैद्यकीय उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांनाही तासनतास ताटकळत ठेवणे व नंतर त्यांना खासगी रुग्णालयात जायला सांगून अंग काढून घेणे, आपले लागेबांधे असलेल्या रुग्णालाच शस्त्रक्रियेसाठी पाठविणे असे एक ना अनेक गैरप्रकार या रुग्णालयात राजरोसपणे घडत आहेत.
राज्यभरातील रुग्णांचा ओढा
दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड महापालिकेने वायसीएम रुग्णालय सुरू केले. सुरवातीला या रुग्णालयावर ‘पांढरा हत्ती पोसला जातोय’, अशी टीकाही झाली. मात्र सर्वप्रकारच्या रुग्णसेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याने अल्पावधीतच हे रुग्णालय नावलौकिकास आले. पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्याच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, बाहेरगावचे नातेवाईक हे देखील शहराबाहेरून केवळ उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयात येतात. मात्र, काही वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवेत अग्रेसर असणाऱ्या ‘वायसीएम’ रुग्णालयात आता परिस्थिती बदलली आहे.
येथील डॉक्टर, निवासी डॉक्टर, कर्मचारी यांचे रुग्णांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय पदवी घेताना रुग्णसेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याची शपथ घेतात. मात्र, या शपथेतील सर्व नैतिकता धाब्यावर बसवून केवळ रुग्णसेवेऐवजी हितसंबंध जपले जात आहेत.
एजंटाच्या नेमणुकीची चर्चा
रुग्णाला वेळेवर उपचार न देणे, रुग्ण गंभीर असल्यास त्याचा फायदा घेऊन नातेवाइकांना रुग्णास खासगी रुग्णालयात हलविणे, त्याबदल्यात संबंधित रुग्णालयाकडून टक्केवारी घेणे असे अनेक गंभीर प्रकार या रुग्णालयात घडत आहेत. गंभीर रुग्णांचे नातेवाईक हेरून त्यांना अन्यत्र हलविण्यासाठी रुग्णालयाच्या परिसरात ‘एजंट’ नेमले जात असल्याची चर्चा आहे. या आणि अशा अनेक गैरप्रकारांमुळे वायसीएम रुग्णालयाचा नावलौकिक धुळीस मिळत आहे.
सध्या रुग्णालयातील आपत्कालीन विभागात २४ खाटा आहेत. जागेअभावी येथील क्षमता वाढविण्यास अडचणी येत आहेत. मात्र, ज्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची गरज नाही, अशी रुग्णांसाठी आम्ही नवीन ओपीडी सुरू करणार आहोत. जेणेकरून आपत्कालीन विभागातील गर्दी कमी होऊन, तेथील गंभीर रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल.
- डॉ. अभय दादेवार, विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
काही दिवसांपूर्वी दोन डॉक्टर कट प्रॅक्टिस करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले होते. त्यांच्याविषयी तक्रारी आल्यानंतर गेल्या आठवड्यातच दोन्ही डॉक्टरांना आम्ही निलंबित केले आहे. यापुढेही असा प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्था
रुग्णालयाची सद्यःस्थिती
७५० - एकूण खाटा
३५० - डॉक्टरांची संख्या
४८ - तीन आयसीयूमधील खाटा
१६ - एकूण विभाग
४० ते ५० - दररोज होणाऱ्या शस्त्रक्रिया
२२०० ते २५०० - दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.